नेमकं प्रकरण काय?
कोमल आणि अक्षय (नावं बदललेली) हे दोन्ही उच्चशिक्षित तरुण-तरुणी नातेवाईकांच्या मध्यस्थीने विवाहबंधनात अडकले होते. त्यांनी नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहून कोमल सासरी आली. मात्र पती अक्षय सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास टाळाटाळ करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. वारंवार प्रयत्न करूनही पतीचा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि त्याला संसारात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर कोमल माहेरी परतली.
advertisement
न्यायालयाने दिला त्वरित दिलासा
शारीरिक संबंध प्रस्थापित न झाल्याच्या कारणावरून कोमलने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेत पती अक्षयने कोणतीही ओढाताण न करता लेखी स्वरूपात बिनशर्त कबुली दिली की, "आमच्यामध्ये कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत." हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार, जर प्रतिवादीने स्वतःहून कबुली दिली असेल आणि तथ्यांमध्ये वाद नसेल, तर साक्ष किंवा पुराव्यांची दीर्घ प्रक्रिया न राबवता निर्णय दिला जाऊ शकतो.
न्यायालयीन वेळ आणि मानसिक ताण वाचला
न्यायाधीश बी. डी. कदम यांनी कायद्याचा हा प्रभावी वापर करत त्वरित निकाल दिला. कोमलच्या बाजूने ॲड. धनंजय जोशी आणि ॲड. प्रतीक दाते यांनी काम पाहिले, तर पतीच्या बाजूने ॲड. स्मिता देशपांडे यांनी सहकार्य केले. या जलद निकालामुळे दोन्ही पक्षांचा मानसिक ताण कमी झाला असून सामाजिक आणि कायदेशीर नुकसान टाळता आले.
