सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम जमिनीवर, पिकांवर आणि परिणामी थेट आपल्या आरोग्यावर होताना पाहायला मिळत आहे.
पुणे: गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम जमिनीवर, पिकांवर आणि परिणामी थेट आपल्या आरोग्यावर होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक लोक सेंद्रिय भाजीपाला आणि फळांची खरेदी करत आहेत. बाजारात अनेक जण सेंद्रिय उत्पादनांची खरेदी करताना दिसत आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की, आपण जे सेंद्रिय भाजीपाला किंवा फळे खरेदी करतो, ती खरोखर सेंद्रिय आहेत का? सेंद्रिय भाजीपाला फळे कशी ओळखायची? या संदर्भात सेंद्रिय शेती अभ्यासक डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
सेंद्रिय शेती म्हणजे काय?
सेंद्रिय शेती म्हणजे रसायनांचा वापर न करता केलेली शेती. या पद्धतीत रासायनिक खते किंवा औषधे न वापरता शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत यांचा वापर केला जातो. मातीची सुपीकता टिकवून ठेवून नैसर्गिक पद्धतीने पिके घेतली जातात. त्यामुळे अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी मिळते. डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांपासून शेतीतील अनेक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला जात आहे आणि याचे परिणाम देखील आपण भोगत आहोत. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीकडे आणि उत्पन्नाकडे वळायला हवं.
advertisement
तुम्ही सेंद्रिय भाजीपाला-फळे खरेदी करत असाल तर ते नक्की सेंद्रिय आहेत का? हे ओळखण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा. सेंद्रिय भाजीपाला रासायनिक पिकांपेक्षा कमी आकर्षक असतो. त्याची चव आणि आकार थोडा वेगळा असतो. सेंद्रिय पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जात नाही, त्यामुळे कधीकधी पिकांवर कीड लागलेली किंवा डाग असतात. या बाबी लक्षात घेतल्यास सेंद्रिय उत्पादन सहज ओळखण्यास मदत होते.
advertisement
या बाबी तपासणे महत्त्वाचे
भाजीपाला-फळे खरंच सेंद्रिय आहेत की नाही, तंतोतंत ओळखण्यासाठी उत्पादनाचे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण असणे आवश्यक असल्याचं डॉ. प्रशांत यांनी सांगितलं. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण धोरणानुसार काही संस्था शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तपासणी करतात की, शेतात रसायनांचा वापर होत आहे का? कीटकनाशक वापरले जात आहेत का? आणि कोणती खते वापरली जात आहेत. त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पिकाला सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र दिलं जातं. त्यामुळे सेंद्रिय शेतमाल खरेदी करण्यापूर्वी तपासावे की त्याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन (एनपीओपी) किंवा पार्टीसिपटोरी गॅरंटी सिस्टिम (पीजीएस) चे प्रमाणपत्र आहे का. प्रमाणपत्रावर संस्थेचा लोगो किंवा क्रमांक आहे का तेही पाहावे. शेतमालावर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचे नाव व पत्ता तपासून बघा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 10:51 PM IST







