फुरसुंगी नगरपरिषदेसाठी पहिलीच निवडणूक
फुरसुंगी नगरपरिषदेसाठी होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे शहराचे लक्ष याकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण 7 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना आणि आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या जागेसाठी उमेदवार दिलेला नाही, तर 2 अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.
advertisement
निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू
यापैकी, आम आदमी पक्षाचे यशवंत अरुण बनसोडे हे भोसले व्हिलेज, फुरसुंगी येथील रहिवासी आहेत, ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे हे सोमवारी सकाळी अंदाजे 8:30 वाजण्याच्या सुमारास सासवड रोड रेल्वे स्टेशनवरून भोसले व्हिलेजकडे आपल्या कारमधून येत होते. याचवेळी एका व्यक्तीने त्यांची कार अडवली. बनसोडे यांनी कारची काच खाली केल्यानंतर, त्या व्यक्तीने त्यांना थेट धमकी दिली. त्याने 'तू निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करू,' असे धमकावले. धमकी देणाऱ्याचा एक साथीदार रेल्वे रुळांजवळ थांबला होता.
संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल
दरम्यान, या गंभीर घटनेनंतर बनसोडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याविषयी फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी माहिती दिली की, बनसोडे यांच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी दिलेल्या वर्णनानुसार, धमकी देणाऱ्याचे स्केच तयार करण्याचे काम सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
