तिकीट दर वाढले, हॉटेल्सही महागली
विमान कंपन्यांच्या वेळापत्रकातील व्यत्ययाचा थेट फटका प्रवाशांच्या खिशाला बसला आहे. ज्या शहरांसाठी सामान्यतः आठ ते दहा हजार रुपये तिकीट दर असतो, अशा दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरू या मार्गांवर आता २० ते ३० हजार रुपये इतका अवाजवी तिकीट दर आकारला जात आहे.
विमानतळाजवळील हॉटेलचे दरही याच काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अडचणीच्या वेळी एअरलाइन्स आणि विमानतळाजवळील हॉटेल्सनी सहकार्य करणे अपेक्षित असताना, अवाजवी भाडेवाढ करून प्रवाशांचे शोषण करणे अनैतिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
advertisement
केवळ विमाने रद्द झाली नाहीत, तर प्रवाशांना तिकीटासाठी जादा पैसे मोजूनही विमानासाठी अनेक तास वाट पाहावी लागली. शुक्रवारी रात्री १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३२ विमाने रद्द झाली आणि उर्वरित उड्डाणेही विलंबाने सोडण्यात आली. प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विमानासाठी आठ ते दहा तास थांबल्यानंतर विमान रद्द झाल्याचे समजल्याने त्यांची प्रचंड चिडचिड झाली. ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर आणि कर्नल (निवृत्त) शशिकांत दळवी यांच्यासह अनेक प्रवाशांनी आपले हाल सांगितले. श्री. दळवी यांना भोपाळला लग्नासाठी जाता आले नाही, तर पंडित कशाळकर वेळेवर कोलकात्यातील संगीत संमेलनासाठी पोहोचू शकले नाहीत.
गोंधळामुळे प्रवाशांना आणखी एक मनस्ताप सहन करावा लागला. विमान रद्द झाल्यानंतर आपले लगेज (सामान) परत घेण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना कंपनीने ते तिथेच टाकून दिल्याचे आढळले. त्यामुळे प्रवाशांना आपले सामान शोधण्यासाठी दोन ते चार तास विमानतळावर फिरावे लागले.
डीजीसीए नियमांमुळे समस्या; केंद्र सरकारने घेतली दखल
विमानांच्या वेळापत्रकात हा मोठा व्यत्यय येण्यामागे डीजीसीएच्या (DGCA) फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट (FDTL) नियमांमध्ये अलीकडे केलेल्या बदलांचा परिणाम आहे. या नियमांमुळे विमान कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी होऊन इंडिगोच्या सेवेवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे.
केंद्रीय हवाई नागरी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या समस्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. "प्रवाशांचे हित लक्षात घेऊन आणि विमान सुरक्षिततेत कोणतीही तडजोड न करता डीजीसीएच्या आदेशांना तत्काळ स्थगिती दिली आहे. पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व गोंधळाला अधिकारी आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जबाबदार असून त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
