नेमकी घटना काय?
कोथरूडमधील पौड रोड येथील वसंतनगर परिसरात राहणारे रवी दीपक गागडे (वय २७) हे एका ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. रवी आणि त्यांची पत्नी प्रिया (वय २२) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक कारणावरून खटके उडत होते. ३१ डिसेंबरच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रिया पतीशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र रवी यांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि डोळे मिटून झोपल्याचे नाटक केले.
advertisement
या प्रकारामुळे प्रियाचा पारा चांगलाच चढला. रागात तिने स्वयंपाकघरात गॅसवर उकळत असलेला चहा आणला आणि क्षणाचाही विचार न करता तो झोपलेल्या रवीच्या चेहऱ्यावर ओतला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे रवीचं कपाळ आणि चेहरा गंभीररीत्या भाजला.
घटनेनंतर जखमी रवी यांनी तातडीने ससून रुग्णालयात धाव घेतली. तिथे उपचार झाल्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रिया रवी गागडे हिच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस कर्मचारी मोहन दळवी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या या जोडप्यामध्ये किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलले गेल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
