भक्तीचा प्रवास ठरला शेवटचा
मांजरी बुद्रुक येथील तेजस देविदास दगडे (२६), अभिषेक यादव (२६) आणि सचिन बिरादार (२७) हे तिघे मित्र गेल्या १८ दिवसांपूर्वी घरून आनंदाने देवदर्शनासाठी निघाले होते. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन ही मित्रमंडळी आपल्या घराकडे, पुण्याकडे परततील अशी आशा कुटुंबीयांना होती. मात्र, गुजरातच्या धाधेला वळणावर नियतीने घात केला. त्यांची सुसाट कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर जोरात आदळली.
advertisement
अपघाताचा भीषण थरार
हा अपघात इतका भयानक होता की, धडकेमुळे कारचे इंजिन तुटून थेट शेतात फेकले गेले. गाडी दुभाजकाला धडकून उलटली आणि रस्त्यापासून सुमारे २० फूट खोल शेतात कोसळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. ज्या घरात देवदर्शनाहून मुलं परत येतील म्हणून तयारी सुरू होती, तिथे त्यांच्या निधनाची बातमी धडकली आणि एकच आक्रोश झाला.
एक स्वप्नवत आयुष्य अधुरेच
मृत तेजस दगडे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हुशार तरुण होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर (निवृत्त पोलीस उपनिरीक्षक) तो मांजरीमध्ये मंगल कार्यालयाचा व्यवसाय सांभाळून आपल्या कुटुंबाला आधार देत होता. अत्यंत मनमिळावू आणि लाघवी स्वभावाच्या तेजसच्या जाण्याने दगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुण्याच्या मांजरी स्मशानभूमीत जड अंतःकरणाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भक्तीचा हा प्रवास असा अर्धवट संपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
