नेमकी घटना काय?
'पुणे ग्रँड टूर' सायकल स्पर्धेमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. याच वेळी सह्याद्री हॉस्पिटलमधील एका अत्यंत गंभीर रुग्णासाठी रक्ताचे नमुने एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पोहोचवणे तातडीचे होते. रस्ते मार्गे जाणे अशक्य असल्याने रुग्णालय प्रशासनाने पुणे मेट्रोकडे मदत मागितली.
advertisement
मेट्रो प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता आपल्या यंत्रणेला सतर्क केले. रुग्णालयाचे कर्मचारी अक्षय कोलते यांनी रक्ताचे नमुने घेऊन गरवारे ते वनाज स्थानकांदरम्यान प्रवास केला. मेट्रो स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी विशेष ताळमेळ राखत त्यांना प्राधान्याने प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. रस्ते वाहतुकीचा कोणताही अडथळा न आल्याने हे नमुने 'गोल्डन अवर'मध्ये पोहोचले आणि रुग्णावर वेळेत उपचार करणे शक्य झाले.
"अशा वैद्यकीय तातडीच्या वेळी मेट्रोचा उपयोग होणे समाधानकारक आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या टीमने कळवताच आम्ही स्थानक कर्मचाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या होत्या," असे महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.
शहरातील गर्दी आणि रस्त्यांवरील निर्बंधांच्या काळात मेट्रोने आपले वेळापत्रक सांभाळत या वैद्यकीय कामाला दिलेले प्राधान्य सध्या पुणेकरांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
