म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांमधील ४ हजार १६८ घरांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीला विक्रमी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची संख्या खूप मोठी असल्याने कागदपत्रांच्या आणि आरक्षणांच्या पडताळणीला वेळ लागत आहे. त्यामुळे सोडतीला विलंब झाल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
advertisement
म्हाडाने १६ किंवा १७ डिसेंबरची तारीख निश्चित केली असून, या सोडत समारंभासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्याचं नियोजन आहे. सध्या विविध आरक्षणांनुसार आलेल्या अर्जांची संबंधित विभागांकडून कसून पडताळणी केली जात आहे. ही पडताळणी शनिवार, १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गाय-म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज
आचारसंहितेमुळे परवानगी आवश्यक
पुढील आठवड्यातच जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोडत काढण्यासाठी कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या हिताची आणि महत्त्वाकांक्षी सोडत असल्याने आचारसंहिता लागल्यास राज्य निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन सोडत जाहीर केली जाईल, अशी माहितीही आढळराव पाटील यांनी दिली.
म्हाडाकडे ४४६ कोटींचा निधी जमा
या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत वारंवार वाढवण्यात आली होती आणि ती अखेरीस ३० नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली. प्रत्येक अर्जदाराकडून ७०८ रुपये शुल्क आणि २० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे. त्यानुसार, अर्जदारांनी म्हाडाकडे एकूण ४४६ कोटी ९७ लाख ५९ हजार ६७६ रुपये एवढा प्रचंड निधी जमा केला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत ११ डिसेंबर रोजी काढण्यात येणार होती, मात्र विक्रमी अर्जामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.
