नेमकी घटना काय?
मुळशी तालुक्यात सध्या वर्तुळाकार मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी वाळू घेऊन निघालेला एक भरधाव डंपर २० तारखेला कातरखडक गावातील वळणावरून जात होता. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने डंपर थेट रस्त्याशेजारी असलेल्या घरात घुसला. धडक इतकी जोरदार होती की घराची एक बाजू पूर्णपणे जमीनदोस्त झाली.
advertisement
ढिगाऱ्याखाली गाडले गेले आयुष्य
अपघातावेळी नंदा मालपोटे (वय ५०) या घरातच होत्या. भिंत कोसळल्याने त्या राडारोड्याखाली अडकल्या. या घटनेमुळे परिसरात एकच कल्लोळ उडाला. ग्रामस्थांनी आणि पौड पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नंदा मालपोटे आणि अन्य एका महिलेला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच नंदा मालपोटे यांचा मृत्यू झाला होता.
डंपरचालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी नंदा मालपोटे यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पौड पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे आणि बेदरकारपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
