मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र महेश जोशी (वय २३) आणि आरोपी आशिष सुर्वे यांच्या कुटुंबात मागील काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री नऊच्या सुमारास हा वाद शिगेला पोहोचला. आरोपींच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवत आशिष सुर्वे, त्याचे सासरे आप्पासाहेब शिंदे, सुजल सोलंकी आणि इतर नातेवाइकांनी जोशी कुटुंबाला गाठले. संतापलेल्या आरोपींनी सुरेंद्र जोशी, त्यांचे काका आणि चुलत भाऊ गौरव यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले.
advertisement
या जीवघेण्या हल्ल्यात तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेंद्र जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आशिष सुर्वे आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गंभीर दुखापत करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या उपनगरांमध्ये किरकोळ वादातून होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाली आहे. यात पार्किंग, कचरा टाकणे किंवा सोशल मीडियावरील कमेंट्स यांसारख्या अगदी क्षुल्लकर कारणावरून थेट शस्त्रांचा वापर करत हल्ला केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
