मावळ : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. या निवडणुकीत एकीकडे मंत्री आणि आमदाराचे घरचे आणि नातेवाईक निवडणूक लढत होते. काही जण विजयी झाले तर काही जण पराभूत झाले आहे. पण पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात एक पेरू विकणारी महिली नगरपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाली आहे. या विजयामुळे महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
advertisement
लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे. रोज पेरू विकून आपली रोजीरोटी चालवणारी, सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला आज लोकांच्या विश्वासावर नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. भाग्यश्री महादेव जगताप असं या विजयी उमेदवार महिलेचं नाव आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र दिसून आलं आहे. काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या भाग्यश्री जगताप यांना 1468 मतं मिळाली. तर भारतीय जनता पार्टीच्या रचना विजय सिंनकर यांना 860 मतं मिळाली. 608 मतांनी भाग्यश्री जगताप विजयी झाल्या.
सकाळी पेरू विक्री अन् रात्री मतदारांच्या गाठीभेटी
भाग्यश्री जगताप यांची निवडणूक लढवण्याची कहाणी ही कार्यकर्त्यांना आदर्श देणारी आहे. भाग्यश्री जगताप या सकाळ–दुपार पेरू विक्री करून संसाराचा गाडा हाकायचा आणि संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करायच्या.
फळ विक्रेत्या भाग्यश्री या खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात राहणाऱ्या आहेत. या मतदारसंघात प्रचाराच्यावेळी भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत होतं. आता त्यांचा हा संघर्ष, कष्ट आणि जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलला आहे.
आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे दिलेल्या संधीला जनतेने ठाम कौल दिला आणि लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. हा विजय केवळ एका महिलेचा नाही, तर संविधानावर, मताच्या शक्तीवर आणि सामान्य माणसाच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे. त्यामुळेच आज या पेरू विकणाऱ्या महिलेच्या ऐतिहासिक विजयाचं मावळ तालुक्यात सर्वत्र कौतुक केलं जात आहे..
