ग्रामस्थांनी अहिनवेवाडी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करून दुरुस्तीची मागणी केली.मात्र, प्रत्यक्षात केवळ आश्वासने मिळाली आहेत. लवकरच मुरूम टाकून दुरुस्ती होईल असेही सांगण्यात आले, पण अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
स्थानिक रहिवासी संतोष पवार यांनी सांगितले की, हा रस्ता आमच्या गावाचा श्वास आहे. दररोज याच मार्गावरून शाळकरी मुले आणि ग्रामस्थ प्रवास करतात. तरीसुद्धा ग्रामपंचायतीकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. आश्वासनांवर आमचे जीवन चालत नाही.
advertisement
तर दुसरीकडे, रहिवासी सुषमा गायकवाड यांनी ग्रामपंचायतीला सहकार्याची तयारी दर्शवूनही पुढाकार दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही ग्रामपंचायतीला सहकार्य करू इच्छितो, पण त्यांच्याकडून काही हालचालच होत नाही. त्यामुळे आमचा त्रास अधिक वाढतो आहे.
नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला असून, व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या माध्यमातूनही आवाज उठवला आहे. तरीही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. रमेश जाधव या ग्रामस्थांनी चेतावणी दिली की, जर लवकरच दुरुस्ती सुरू झाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतीला कर भरणार नाही. आवश्यक असल्यास आम्ही रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन करू.”
ग्रामस्थांनी एकजुटीने हा मुद्दा हाताळण्याचा निर्णय घेतला असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.