नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. काही काळापासून त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होते. रविवारी सायंकाळी फिर्यादी महिला निगडी येथील आपल्या कंपनीतून काम संपवून बाहेर पडली होती. त्याच वेळी तिचा पती तिथे दबा धरून बसला होता. पत्नी गेटच्या बाहेर येताच पतीने तिला गाठले आणि रागाच्या भरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
advertisement
पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत, "तू मला सोडून दुसऱ्यासोबत राहतेस, आज तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी दिली. रागाच्या भरात त्याने रस्त्याशेजारी पडलेला एक मोठा दगड उचलला आणि पत्नीला खाली पाडून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक जमा झाल्याने मोठा अनर्थ टळला.
जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
