या मंदिराचे व्यवस्थापन श्री राम जी संस्थान ट्रस्टकडे असून गेल्या सात पिढ्यांपासून तुळशीबाग वाले कुटुंब ही परंपरा जपत आहे. मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती देताना रामदास तुळशीबाग वाले यांनी सांगितले की, नारोआप्पा तुळशीबाग वाले यांनी पेशव्यांच्या परवानगीने ही जागा खरेदी केली होती. त्यानंतर 1761 साली या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. त्या काळात बांधलेले हे मंदिर आजही आपल्या मूळ स्वरूपात उभे आहे, हीच त्याची खास वैशिष्ट्ये मानली जातात.
advertisement
महाराष्ट्रातील असं मंदिर, पांडवांच्या वनवासाची देते साक्ष, तुम्हाला आख्यायिका माहितीये का?
स्वातंत्र्यासाठी बैठका
तुळशीबाग राम मंदिराला धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या मंदिर परिसरात अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्याचे सांगितले जाते. देशभक्त आणि समाजनेते याठिकाणी एकत्र येत असत. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक नामवंत व्यक्तींच्या बैठका येथे झाल्या होत्या, ज्यामुळे या मंदिराला इतिहासातील एक वेगळी ओळख मिळाली.
कसं आहे मंदिर?
मंदिराच्या वास्तुशैलीकडे पाहिले तर ते पूर्णपणे चुन्याच्या बांधकामातून उभारलेले आहे. पारंपरिक पद्धतीने बांधलेले हे मंदिर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिरातील मूर्ती देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मार्बलच्या मूर्ती असून त्या वनवासी रूपातील आहेत. या प्रकारच्या मूर्ती भारतात इतरत्र कुठेही आढळत नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे भाविकांसाठी आणि इतिहास अभ्यासकांसाठी हे मंदिर विशेष आकर्षण ठरते.
रामनवमीला उत्सव
तुळशीबाग राम मंदिरात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः रामनवमीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच सीता नवमी हा उत्सव देखील येथे विशेष पद्धतीने साजरा केला जातो, जो इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतो. या उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
आजच्या आधुनिक काळातही पुण्याच्या मध्यवर्ती भागात उभे असलेले तुळशीबाग राम मंदिर शहराच्या इतिहासाची, परंपरेची आणि सांस्कृतिक वारशाची आठवण करून देत आहे. अनेक पिढ्यांपासून जपलेली ही परंपरा आणि मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व यामुळे पुणेकरांच्या मनात या मंदिराला एक विशेष स्थान आहे.





