नेमकी घटना काय?
जखमी झालेल्या तरुणाचे नाव रामलिंग रावसाहेब सुकळे (वय २३, रा. शरदनगर, निगडी) असे आहे. रविवारी (२१ डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास रामलिंग इमारतीमधील लिफ्टने जात होते. यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या गणेश गायकवाड याने त्यांना लिफ्टमध्ये येण्यास मज्जाव केला. "तू लिफ्टने का येतोयस?" असे म्हणत गणेशने रामलिंग यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
advertisement
वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि धक्काबुक्कीत झाले. यावेळी रागाच्या भरात गणेश गायकवाड आणि त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेने रामलिंग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या गणेशने जवळच पडलेले फावडे उचलून रामलिंग यांच्यावर वार केले. या हल्ल्यात रामलिंग गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
पिंपरी-चिंचवड आणि विशेषतः निगडी, चिखली परिसरात क्षुल्लक कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार वाढले आहेत. "सोसायटीमधील किरकोळ वाद जर थेट फावड्याने हल्ल्यापर्यंत पोहोचत असतील, तर सामान्यांनी सुरक्षित कसे राहायचे?" असा प्रश्न त्रिवेणीनगरमधील नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
