पोलीस वर्तुळात एकच खळबळ
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले असून, या निर्णयामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उचलबांगडी झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या कारवाईमध्ये प्रामुख्याने पोलीस स्टेशनमधील विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (एन) अन्वये हे विशेष अधिकार वापरून आदेश दिले आहेत.
advertisement
एकूण 32 जणांचा समावेश
या बदल्यांमध्ये 3 सहाय्यक फौजदार, 10 पोलीस हवालदार आणि 19 पोलीस अंमलदार अशा एकूण 32 जणांचा समावेश आहे. लोणी काळभोर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या असल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे.
आयुक्त अमितेश कुमार यांचं मोठं पाऊल
मात्र, पोलीस दलातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एकाच स्टेशनमधील एवढ्या मोठ्या फौजेची बदली होण्यामागे केवळ प्रशासकीय कारण नसून काही गंभीर बाबी असण्याची शक्यता आहे. या बदल्यांमुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला जाणार आहे. कामात शिस्त आणण्यासाठी आयुक्त अमितेश कुमार यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
नवीन अनुभवी टीम तैनात
दरम्यान, पोलीस आयुक्तांच्या या आदेशानुसार, बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच वेळी 32 जणांना हटवल्यामुळे रिक्त झालेल्या जागी आता नवीन अनुभवी टीम तैनात केली जाणार आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाची प्रतिमा सुधारण्यासाठी घेतलेला हा निर्णय आगामी काळात किती प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
