अजितदादांसोबतच्या बैठकीत कोण कोण?
अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना फोन केला अन् एकत्र लढलो तर कसा फायदा होईल, यावर बैठकीत चर्चा देखील झाली. त्यामुळे आता येत्या 2 दिवसात पिंपरी चिंचवडमधील जागांचा अंतिम निर्णय होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली. एक तास झालेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच घासाघीस झाली. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनी ही दावा केलाय.
advertisement
बैठकीला मी नव्हतोच - रोहित पवार
मात्र, आपण या बैठकीला गेलो नव्हतो, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी रोहित पवारांचा फोटो अजितदादांच्या बंगल्याबाहेर कसा? असा सवाल विचारला जात आहे. फोटोमध्ये रोहित पवार हे अजित पवारांच्या घरी दाखल होताना स्पष्टपणे दिसून येतात तसेच अजित पवार यांच्या वाहनाचे चालक त्यांचे स्वागत करताना सुद्धा दिसत आहेत.
रोहित पवार काय म्हणाले?
अमोल कोल्हे साहेब हे अजित पवारांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत इतरही काही कार्यकर्ते होते गेले. काही तास मी इथं भीमथडीमध्ये आहे. आज भीमथडीचा शेवटचा दिवस होता, असं रोहित पवार म्हणाले. इथे जर काही बोललो तर निवडणुकीच्या रणनीतीमध्ये गडबड होईल असं मला वाटतं, असं म्हणत रोहित पवार यांनी प्रश्नाला बगल दिली.
रोहित पवारांच्या गाडी अन् पत्रकार थोडक्यात बचावले
पुण्यात अजित पवारांच्या बंगल्यातून भरधाव वेगात निघालेल्या वाहनातून रविकांत वरपे यांच्यासह रोहित पवार हे बाहेर पडले. माध्यमांना टाळण्यासाठी स्वतःची गाडी न वापरता दुसरी गाडी अजित पवारांच्या बंगल्यातून अत्यंत वेगात बाहेर पडली. मुख्य रस्त्याजवळ थांबलेल्या पत्रकारांना पाहून या वाहनाच्या चालकाने आणखी वेग वाढवला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने गर्दी कमी होती तसेच पत्रकारांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. वाहनात रविकांत वरपे आणि रोहित पवार हे दोघे ही जणं होते. बंगल्यातून बाहेर पडलेले हे वाहन थेट भीमथडी जत्रेचे आयोजन केलेल्या ठिकाणी येऊन पोहचले आणि त्यातून रोहित पवार आणि वरपे हे दोघे ही उतरले. याबाबत पत्रकारांनी रोहित पवार यांना सांगितले तेव्हा रोहित पवार यांनी स्वतः त्या चालकाला सुनावले.
