आरोपी अरविंद प्रल्हादसिंग राजपुरोहित याने आपल्याच नातेवाईकाची घरफोडी करून तब्बल ५८० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेचार लाखांची रोकड लांबवली होती. विश्वासू व्यक्तीनेच डल्ला मारल्यामुळे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक आयुक्त डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे आणि पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या तपास पथकाने घटनेच्या परिसरातील सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासाचे धागेदोरे जुळवत असताना अरविंद राजपुरोहित याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या. सखोल चौकशीत त्याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी केवळ आरोपींना पकडले नाही, तर चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले असून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपींना उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
advertisement
पुणे शहर आणि उपनगरांमध्ये विशेषतः सुट्यांच्या काळात बंद घरे लक्ष्य केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही अत्यंत महत्त्वाची कारवाई केली आहे. या यशात उपनिरीक्षक संजय नरळे, नीलेश बहाख आणि त्यांच्या पथकाचे मोठे योगदान आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घराबाहेर जाताना मौल्यवान दागिने आणि मोठी रोकड बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी किंवा घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि डिजिटल लॉकचा वापर करावा. तसेच, घरफोडीच्या गुन्ह्यात आपल्याच परिचयातील व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आर्थिक व्यवहारांची माहिती गोपनीय ठेवावी. या कारवाईमुळे सराईत चोरट्यांचे धाबे दणाणले असून वारजे माळवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
