डिसेंबरने मोडला १० वर्षांचा रेकॉर्ड: वातावरणातील बदलांमुळे यंदाचा डिसेंबर गेल्या दशकातील सर्वाधिक थंड महिना ठरला आहे. या महिन्यात पुण्याचे सरासरी किमान तापमान १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विशेष म्हणजे, ३१ पैकी १८ दिवस पारा १० अंशांच्या खाली होता, तर ५ दिवस तो १० ते ११ अंशांदरम्यान स्थिरावला होता. यापूर्वी २०१६ मध्ये डिसेंबरचे सरासरी किमान तापमान ११.६ अंश सेल्सिअस होते, ज्याचा रेकॉर्ड यंदा मोडला गेला आहे.
advertisement
यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबल्याने हवेत ओलावा होता. ऑक्टोबर हिटचा कडाका जाणवण्यापूर्वीच थंडीने जोर धरला आणि नोव्हेंबरपासून पुणेकरांनी 'गुलाबी थंडी'चा अनुभव घेतला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून उत्तरेकडील थंड वारे सक्रिय झाल्याने तापमानाचा पारा वेगाने घसरला. ११ डिसेंबर रोजी या हंगामातील नीचांकी ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेल्या वर्षी थंडी गायब असल्याने ज्या स्वेटर आणि जॅकेट्सना कपाटाबाहेर पडण्याची संधी मिळाली नव्हती, ती यंदा पुणेकरांनी भरभरून वसूल केली. संध्याकाळनंतर वाढणारा गारठा आणि पहाटेच्या कडाक्याच्या थंडीमुळे मफलर, कानटोप्या आणि विविध प्रकारचे उबदार कपडे घालून फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. नवीन वर्षाच्या स्वागतालाही पुणेकर थंडीचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडल्याचे चित्र दिसले.
पुढील आठवड्याचा अंदाज: उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव आता काहीसा कमी होणार असल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ होईल. यामुळे थंडीचा कडाका कमी होऊन हवेत काहीसा उबदारपणा जाणवू लागेल. तरीही, नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
