अद्याप मेट्रो 3 सुरू होण्याबद्दलची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. या संबंधितच्या सध्या तरीही चर्चाच आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 मार्गावर मेट्रोचा पहिला टप्पा पुढच्या वर्षापासून सुरू होणार आहे. या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 23.3 किलोमीटर लांबीची ही मार्गिका मार्च 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गामुळे विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या मार्गिकेमुळे सध्या कार्यरत असलेल्या मेट्रोच्या इतर मार्गांवरही प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करून 31 मार्च 2026 पर्यंत सेवा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क थेट शहराशी जोडले जाणार आहे. याशिवाय, सध्याच्या मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2 या सिव्हिल कोर्ट स्थानकाजवळ स्कायवॉकद्वारे मेट्रो लाईन 3 जोडले जाणार आहे. या सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. सिव्हिल कोर्ट हे मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी केंद्र सरकारकडून आणखी दोन महत्त्वाच्या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि खराडी ते खडकवासला या मार्गांच्या विस्ताराला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पिंपरी- चिंचवड ते निगडी या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, ते सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, स्वारगेट ते कात्रज हा भूमिगत मेट्रो मार्ग काही तांत्रिक कारणांमुळे काहीसा रखडलेला आहे. याशिवाय, रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या मार्गांचे कामही लवकरच सुरू होणार आहे. या मार्गांसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुणे मेट्रोच्या विस्ताराला गती मिळणार आहे. पुणेसह आजूबाजूच्या परिसरातही मेट्रोचं जाळं अधिकच घट्ट पद्धतीने विणण्याचे काम सुरू आहे.
पुढील टप्प्यात वडगाव ते कात्रज (मुंबई–बंगळूर बायपास मार्गे), वडगाव ते चाकण, खराडी ते पुणे विमानतळ, शिवाजीनगर ते कोंढवा, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड रेल्वे अशा नव्या मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचीही शक्यता आहे. पुणे मेट्रोच्या या व्यापक विस्तारामुळे शहरातील विविध भाग एकमेकांशी जोडले जाणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो नेटवर्क विस्तारल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच सार्वजनिक वाहतुकीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
