राज ठाकरेंचे सरकारला सवाल
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहे. पुण्यात ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यांच्या अंगावर फक्त एक कपडा शिल्लक आहे. आता रोगराई पसरेल त्याकडे कोण बघणार, एक अधिकारी निलंबित करुन प्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनाच यात लक्ष घालावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.
advertisement
राज ठाकरे यांचा अजित पवार यांना टोला
पुण्यासारख्या शहरांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातले हेवेदावे सोडून एकत्र यायला हवे. सर्वांनी यात जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे. एखादा प्रकल्प आणायचा असेल तर सर्वांशी चर्चा का केली जात नाही? एकट्या पक्षाच काम नाही. दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहे. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.
वाचा - 'सख्या बहिणीची काजळी घेतली नाही आणि...' सुषमा अंधारेंचा अजितदादांना टोला
टाऊन प्लॅनिंग नाही : राज ठाकरे
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. टाऊन प्लॅनिंग होत नाहीय म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. एकाचेही लक्ष नाही. जोपर्यंत सगळ्या यंत्रणा एकत्र बसणार नाही. तोपर्यंत काही होणार नाही. फक्त नुकसान होणार आहे. कुठली यंत्रणा काय करते हे दुसऱ्या यंत्रणेला माहिती नाही. तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे. मी संबंधित लोकांशी बोलेल आणि तुम्हाला कळवेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
