राजगुरुनगरमधील 'भवानी मेडिकल'मध्ये सोमवारी हा संशयित तोतया अधिकारी आला. त्याने दुकानाची तपासणी करण्यास सुरुवात केली आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगून दुकानदारावर दबाव टाकला. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याने २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, मेडिकल चालक तरुण चौधरी यांना त्याच्या वागण्यावर संशय आला. त्यांनी त्याचे ओळखपत्र (ID Card) मागितले. ओळखपत्रावरील नाव आणि अधिकाऱ्याची बोलण्याची पद्धत संशयास्पद वाटल्याने त्यांनी तातडीने खेडमधील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधला.
advertisement
विभागाकडून अशा नावाचा कोणताही अधिकारी कार्यरत नसल्याचे समजताच चौधरी यांनी त्याला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच "नाष्टा करून येतो" असे सांगून तो तेथून निसटला.
मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आणि दुकानदारांनी त्याचा मागोवा घेणे सुरूच ठेवले. हा तोतया अधिकारी त्याच्या वॅगनआर गाडीत सीएनजी भरण्यासाठी एका पंपावर थांबला होता. त्याच वेळी सगळ्यांनी त्याला चारी बाजूंनी घेरले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला थेट पोलीस ठाण्यात नेले.
खेड पोलिसांनी आनंद भुजंग याच्यावर तोतयागिरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे त्याने इतरही काही ठिकाणी दुकानदारांना लुटले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या धाडसी कारवाईमुळे राजगुरुनगर मेडिकल असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
