पुण्यात एकत्र निवडणूक लढण्याबाबत शुक्रवारी रात्रीतूनच निर्णय होईल असं बोललं जात असतानात अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे काकांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. तर दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
advertisement
पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार?
त्यामुळं पुण्यात नेमकं कोण कोणासोबत आघाडी करणार? या प्रश्नाचं गूढ शनिवारी दुपारपर्यंत कायम होतं. काका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्या तऱ्हेनं अजित पवारांना चेकमेट करत, महाविकास आघाडीच्या मित्रांशी हातमिळवणी केली, ज्यावरुन अजित पवारांनाही पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं, हे कळत नव्हतं. अजित पवारांची उद्विग्नतेतून जे संकेत मिळते होते, तेच घडलंय. पवारांचे जे नेते अजित पवारांसोबत चर्चा सुरू असल्याचं सांगत होते, त्याच अंकुश काकडेंनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट करत, पुण्यात मविआ एकत्र लढणार असल्याचं जाहीर करून टाकलं.
राष्ट्रवादीचं पुण्यात बिनसलं पण पिंपरीत जुळलं
सायंकाळपर्यंत पुण्यातील मविआचे जागावाटपही ठरल्याची माहिती मिळत होती. त्यामुळं पुण्यात पवार काका-पुतणे विरोधात लढण्याबाबत स्पष्ट संकेत मिळाले. तिकडे पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे भाजपला आव्हान देण्याची दाट शक्यता आहे. कारण, पिंपरी- चिंचवडसंदर्भात अजित पवार आणि शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनीही जिजाई निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतलेली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अजित पवार पिंपरीचिंचवडमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आणि पुन्हा एकदा शनिवारी अमोल कोल्हेंसोबत बैठक केली. त्यामुळं पुण्यात बिनसलं असलं, तरी पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येणार, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.
पुण्यात तिरंगी सामना होण्याची शक्यता
एकंदरीतच, पुणे जिल्ह्यात भाजपविरोधात एकत्र येण्याच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू होत्या.. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.पण, पुणे महापालिकेत मात्र काकांच्या पक्षाला कमी लेखण अजित पवारांच्या अंगलट आल्याचं दिसतंय. त्यामुळंच आता पुण्यात भाजप विरुद्ध अजित पवार विरुद्ध महाविकास आघाडी असा तिरंगी सामना होण्याची चिन्ह आहेत.
