नेमकी घटना काय?
सार्थक शेरकर (मूळ रा. पारनेर, सध्या रा. सरदवाडी) हा तरुण बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास केडगाव चौफुला येथून आपले काम उरकून दुचाकीवरून घरी परतत होता. न्हावरे येथील हॉटेल महाराजाजवळ रस्त्याच्या कडेला उसाने भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. अंधार असल्यामुळे आणि ट्रॉलीला पाठीमागून कोणतेही रिफल्केटर किंवा इंडिकेटर नसल्याने सार्थकला समोर उभी असलेली ट्रॉली दिसली नाही. त्याची दुचाकी वेगात थेट ट्रॉलीवर जाऊन आदळली.
advertisement
या भीषण धडकेत सार्थकच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाने सरदवाडी आणि पारनेर परिसरात शोककळा पसरली आहे. सार्थकच्या वडिलांनी, बाळासाहेब शेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऊस तोडणीच्या हंगामात महामार्गावर उसाच्या ट्रॉल्यांचा वावर वाढला आहे. नियमानुसार प्रत्येक ट्रॉलीला रेडियम रिफल्केटर असणे बंधनकारक आहे. अवघ्या दीडशे-दोनशे रुपयांत मिळणारे हे रिफल्केटर लावण्याकडे चालक दुर्लक्ष करतात. याच 'दीडशे रुपयांच्या' हलगर्जीपणामुळे सार्थकसारख्या अनेक तरुणांना आपले आयुष्य गमवावे लागत आहे.
