पुण्यातील सोहेल शेख हे पोलिस वसाहतीत वास्तव्य करतात. मागील 16 वर्षांपासून पुणे पोलिसात सेवा बजावणारे सोहेल शेख मोठे इतिहासप्रेमी आहेत. सोहेल शेख यांच्या घरात आजही शिवकालीन परंपरेचा ठेवा अनुभवायला मिळतो. शेख यांनी पूर्वजांच्या तलवारी, भाले, ढाली, दांडपट्टे, खंजीर आणि इतर शिवकालीन वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. यातील शस्त्रांना 350 वर्षांहून अधिक इतिहास लाभलेला आहे. या शस्त्रांवर रेखीव कोरीव काम, राजचिन्हे आणि कारागिरीचे सुंदर नमुने दिसतात.
advertisement
सोहेल शेख यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात सचिव पदावर सेवा बजावलेली आहे. आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळताना शेख सांगतात की माझ्या पूर्वजांकडून माझ्यापर्यंत आलेली ही केवळ शस्त्र नाहीत, तर ही आमची संस्कृतीची, शौर्याची आणि परंपरेची ओळख आहे. पूर्वजांनी जपलेली ही ऐतिहासिक परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे.
सोहेल शेख यांनी जतन केलेला हा खजिना म्हणजे इतिहास प्रेमींसाठी पर्वणी आहे. शेख यांचा हा ऐतिहासिक संग्रह पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि त्याकरता शस्त्रांच्या ताकदीचा प्रत्यय येतो. सध्याच्या पिढीत अनेक ऐतिहासिक गोष्टी नामशेष होत असताना शेख यांच्याकडून या ऐतिहासिक गोष्टी जतन करणे म्हणजे समाजाला इतिहासाशी जोडून ठेवण्याचे कार्य ठरत आहे.