पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली आहे. बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीय. येत्या १५ दिवसात परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं जाणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणार आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप बोर्डाकडून अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.
advertisement
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा होतात. याचा निकाल साधारणपणे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाते.
बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत होण्याची शक्यता आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापन २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात होऊ शकतात. तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.