मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या प्राथमिक अभ्यासानुसार, ही मूळ मूर्ती शिवपूर्वकालीन असून तिचा कालावधी थेट 15 व्या शतकात जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील अंतिम शिक्कामोर्तब सविस्तर अहवालानंतर होणार आहे. मंदिराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर साधारण 900 किलो वजनाचा शेंदूर लेप काढण्यात आला असून, ही प्रक्रिया अत्यंत शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने पार पाडण्यात आली. गणपतीचे मुळ रूप पाहण्यासाठी भाविक आतुर आहेत.
advertisement
समोर आलेली मूळ मूर्ती साधारण दोन फूट उंच, चतुर्भुज असून डाव्या हातात अभय मुद्रा, उजव्या हातात आशीर्वाद मुद्रा दिसून येते. दुसऱ्या डाव्या हातात मोदक असून मोदकावर सोंड ठेवलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून अर्धपद्मासनात विराजमान आहे. लंबकर्ण, लंबोदर ही या मूर्तीची वैशिष्ट्ये असून उजव्या बाजूस खालच्या भागात मूषक वाहन कोरलेले आहे. यासोबतच तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभारा देखील भाविकांना पाहता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत असल्याने भविष्यात कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया हाती घेण्यात आली. विविध मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पुरातत्व तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही संपूर्ण प्रक्रिया साधारण दोन आठवड्यांत पूर्ण करण्यात आली. 29 डिसेंबर रोजी मूळ स्वरूपातील मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठा विधी मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांच्यासह मधुरा ठकार, स्वानंद मयुरेश्वर ठकार, साक्षी स्वानंद ठकार यांच्या शुभहस्ते हा विधी संपन्न झाला. वेदशास्त्रसंपन्न कल्याण कानडे गुरुजी व सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पूजाविधी केले. पुणेकरांच्या मंगल कल्याणासाठी विशेष संकल्पही यावेळी करण्यात आला. या निमित्ताने मंदिरात सनईवादन, अथर्वशीर्ष पठण, ढोल-ताशा वादन आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
ऐतिहासिक शिवपूर्वकालीन मूळ कसबा गणपती मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.