पुण्यातील पर्वती पायथा या भागात राहणारे ऋषिकेश मिरजकर आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री मिरजकर यांनी दिवाळीच्या निमित्ताने विशाळगड पन्हाळगड आणि पावनखिंड येथील बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरायांच्या लढाईचा थरार साकारला आहे. 1992 साली ऋषिकेश मिरजकर यांचे वडील अशोक काशिनाथ मिरजकर आणि काका अनिल काशिनाथ मिरजकर यांनी शिवरायांवर असलेल्या निष्ठेप्रती संकल्पनेची सुरुवात केली. पुढे वडिलांचा आणि काकांचा किल्ले उभारणीचा वर्षा मिरजकर कुटुंबाने कायम ठेवला आहे.
advertisement
ऋषिकेश मिरजकर यांनी सांगितले की,“आजच्या पिढीला इतिहास सांगण्यासाठी पारंपरिक पद्धतीपेक्षा दृश्यात्मक माध्यम अधिक प्रभावी ठरते. म्हणून आम्ही ‘हलता देखावा’ तयार करण्याचा निर्णय घेतला.” या देखाव्यात गड-किल्ले, दरवाजे, तोफा, तलवारींची झुंज, आणि रणधुमाळीचा ध्वनीप्रभाव अशा सर्व घटकांचा समावेश आहे. संपूर्ण सेटअप हाताने तयार केलेला असून, यासाठी वाळू,कापूस, थर्माकॉल, प्लायवुड, फॉक्स लाइटिंग आणि छोट्या मोटरांच्या साहाय्याने लढाईची हालचाल दाखवण्यात आली आहे.
भाग्यश्री मिरजकर यांनी सजावटीची जबाबदारी सांभाळली असून, त्यांनी पार्श्वभूमीवर ‘हर हर महादेव’ आणि रणधुमाळीच्या गजराने वातावरण भारावून टाकले आहे. दिवसभर नागरिक आणि लहान मुले या ठिकाणी येऊन इतिहासाची झलक अनुभवत आहेत.या उपक्रमाद्वारे मिरजकर दांपत्याने शिवकालीन शौर्यकथा आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे. परिसरातील नागरिकांनी आणि इतिहासप्रेमींनी त्यांच्या या सृजनशील उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून,शिवप्रेमी पुण्याच्या विविध भागातून हा किल्ला पाहण्यासाठी व संकल्पना पाहण्यासाठी येत आहेत.
शिवप्रेम आणि सर्जनशीलतेचा संगम असलेला हा देखावा दिवाळीच्या उत्साहात संस्कृती आणि इतिहासाची आठवण करून देणारा ठरत आहे. पुण्यातील या अनोख्या सादरीकरणामुळे मिरजकर कुटुंबाची आणि त्यांच्या या सुंदर संकल्पनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.