मृत तरुणींची नावे ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय २०, दोघी रा. पुनावळे, पुणे) अशी आहेत. ऋतुजा आणि नेहा या दोघी दुचाकीवरून आपल्या कामानिमित्त निघाल्या होत्या. धनगर बाबा मंदिराजवळील पेट्रोल पंपाजवळ त्या पोहोचल्या असताना, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने भरधाव वेगात जोरदार धडक दिली.
दुचाकीचा अक्षरशः चुराडा
advertisement
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या वैद्यकीय पथकाने दोघींनाही मृत घोषित केले.
ट्रक चालकाला घेतले ताब्यात
अपघातानंतर ट्रक चालक जितेंद्र निराले याला काळेवाडी पोलिसांनी तात्काळ ट्रकसह ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ट्रकचा वेग अधिक असल्याचे समोर येत असून, काळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास करण्यात येत आहे.
शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दरम्यान, भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निष्पाप दोन तरुण बहिणींचा जीव गेल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आहे. वाहतूक नियमांचे पालन आणि जड वाहनांवर कडक नियंत्रणाची मागणी नागरिकांकडून होत आहे.
