पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, सत्तेच्या दाव्यांवरून थेट पैजेपर्यंत मजल गेल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर यावेळी महापालिकेवर आपलीच सत्ता येणार असून, 128 पैकी तब्बल 125 जागा भाजप जिंकेल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पिंपरीत भाजप की राष्ट्रवादी कोण मारणार मैदान?
advertisement
भाजपच्या या आक्रमक दाव्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विकास साने यांनी थेट पैजेचे आव्हान दिले आहे. भाजपचा दावा खरा ठरला, तर आपण 1 कोटी रुपये देण्यास तयार आहोत, असे त्यांनी न्यूज 18 लोकमत समोर जाहीर केले. भाजपला आव्हान देत त्यांनी, शहरातील जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे 125 जागांचा दावा हा फोल ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
पिंपरीच्या पैजेची राज्यात चर्चा
या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भाजपचे पदाधिकारी राजू दुर्गे यांनीही पैजेचा विडा उचलला. मात्र, आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांसारखे पैसेवाले नसून सामान्य कार्यकर्ता असल्याचे सांगत, पैज हरलो तर 1 लाख रुपये देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना कोऱ्या चेकवर स्वाक्षरी करत ही पैज अधिकृतपणे जाहीर केली, त्यामुळे ही घटना शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण तापले
दरम्यान, केवळ पैजच नव्हे तर सत्तेचा आराखडा आणि शहरातील प्रश्नांवर उपाय काय, यावरही दोन्ही नेत्यांनी आपले कसब पणाला लावले. भाजपकडून विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत सत्तेचा दावा करण्यात आला. तर राष्ट्रवादीकडून महापालिकेतील कारभार, भ्रष्टाचाराचे आरोप, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष यावर बोट ठेवण्यात आले. या पैजेने आणि आरोप-प्रत्यारोपांनी पिंपरी-चिंचवडमधील राजकारण अधिकच रंगतदार झाले असून, आगामी निवडणुकीत जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
