मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी आहेत. म्हाडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्यावतीने वरळी येथे 76 मजली, नायगाव येथे 69 आणि ना. म. जोशी मार्ग येथे सुमारे 54 मजली इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात दक्षिण मुंबईत म्हाडाकडे मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. या घरांची विक्री लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.
advertisement
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही ठिकाणी सुमारे 92 एकर जागेवर 195 बीडीडी चाळी आहेत. त्यामध्ये 15 हजार 593 सदनिका, गाळे आणि व्यावसायिक स्टॉल आहेत. बीडीडी चाळींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जाणार असून, येथील रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे. त्याची आजपासून सुरुवात झाली आहे. बीडीडीवासीयांना घरे देऊन शिल्लक राहणाऱ्या जागेवर म्हाडाकडून निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार आहेत.
व्यापारी संकुलाची निर्मिती
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत एक स्वयंपूर्ण वसाहतीची निर्मिती होणार आहे. यामध्ये स्वतंत्र व्यापारी संकुल शाळा, व्यायामशाळा, रुग्णालय, वसतिगृह आदी सुविधांचे नियोजन असून मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्यजल संचयन यांसारख्या सुविधा देखील असणार आहेत. याशिवाय, मुंबईतील राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचं साक्षीदार असलेल्या जांबोरी मैदान व आंबेडकर मैदानाचं जतन केलं जाणार आहे. चाळीतील जुन्या इमारतींचं देखील म्हाडातर्फे संग्रहालय बनवण्यात येणार आहे.
सुसज्ज घरासह पार्किंग
वरळीतील बीडीडीवासियांना 500 चौरस फुटांच्या घरासह प्रत्येकाला पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी सहा मजली पोडियम पार्किंगची व्यवस्था केली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरणपूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट, 1 फायर लिफ्ट देण्यात आली आहे.