वारीचा हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा नसून अनेकांसाठी तो आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. धाराशिव जिल्ह्यातील पांचाळ दांपत्य हे त्याचेच एक उदाहरण आहे. मागील 24 वर्षांपासून काशीबाई आणि लिंबराज पांचाळ हे दांपत्य अखंडपणे संत तुकाराम महाराजांच्या पालखी वारीत सहभागी होत आहे. वारीसाठी तयारी एक महिना आधीपासूनच सुरू होते आणि मनामध्ये या सोहळ्याबाबत प्रचंड उत्साह असतो.
advertisement
तीन पिढीचे वारकरी
“तीन पिढ्यांपासून आमच्या घरात वारीची परंपरा आहे. माझे वडीलही पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचे. माझं वय आता 65 वर्ष आहे, तरीही मी आणि माझी पत्नी दोघं मिळून आजही पायी वारी करतो. यंदा पावसाअभावी शेतीची पेरणी होऊ शकलेली नाही, तरीही वारीची परंपरा खंडित होऊ दिली नाही. नित्यनियमाने दरवर्षी वारी केली आहे, त्यामुळे यंदाही देहू नगरीत आलो आहोत, असं लिंबराज पांचाळ यांनी सांगितलं.
वारी म्हणजे चालणं, नामस्मरण, सेवा, साधना आणि भक्तीतून प्रपंचाचे समाधान शोधणं. या पवित्र सोहळ्याचे ‘याची देही, याची डोळा’ साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आपल्या कुटुंबीयांसह पंढरपूरच्या वाटेवर आहेत. या सगळ्यांत 24 वर्षांची अखंड निष्ठा जपणाऱ्या पांचाळ दांपत्याचे योगदान हे खऱ्या अर्थाने वारीचे व्रत जपणारे आहे.