हिंदू धर्मात तुळस पूजनीय आणि पवित्र मानली जाते. तुळशीच्या रोपामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. तुळशीखाली भगवान विष्णु तर रोपात लक्ष्मीमातेचा वास असतो, असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीची नियमित पूजा केली जाते. दिवाळीनंतर तुळशीचा विधीवत विवाह केला जातो. तुळशीच्या संगोपनासाठी फार काही करावं लागत नाही. आपल्याकडे काही विशिष्ट कारणांसाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. आयुर्वेदात देखील औषध तयार करण्यासाठी तुळस वापरतात. पण तुळशीची पानं तोडण्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.
advertisement
आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या दिवसापासून तेरा दिवस तुळशीला स्पर्श करू नये. तसेच तिची पाने तोडू नये, असं धर्मशास्त्र सांगतं. तसेच स्नान न करता तुळशीला स्पर्श करू नये आणि तिची पानं तोडू नयेत. संध्याकाळी तुळशीची पानं तोडणं निषिद्ध मानलं जातं. पण जर तुम्हाला औषधोपचारासाठी पानांची गरज असेल तर केवळ याच कारणासाठी तुम्ही पानं तोडू शकता अन्यथा संध्याकाळी तुळशीची पाने कदापि तोडू नयेत. कोणत्याही कारणासाठी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची असतील तर ती तोडण्याकरिता चाकू, कात्री सारखी धारदार शस्त्र किंवा बोटाच्या नखांचा वापर करू नये. नुसत्या बोटांनी हळूवारपणे पानं तोडावीत. तुळशीच्या रोपात लक्ष्मीमातेचा वास असतो. त्यामुळे तुम्हाला जर तुळशीची पानं तोडायची असतील तर त्यापूर्वी तुळशीसमोर हात जोडून मनोमन प्रार्थना करावी आणि पानं तोडण्यासाठी लक्ष्मीमातेची परवानगी घ्यावी. तुळशीच्या संदर्भात या नियमांचे पालन जर तुम्ही केले तर भगवान विष्णु आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी प्राप्त होऊन घरात सुख-समृद्धी नांदेल.