सोन्याच्या दरात घसरण: ग्राहकांना दिलासा
आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,53,500 ते 1,56,600 रुपयांच्या दरम्यान आहे. कालच्या तुलनेत यात मोठी घसरण झाली आहे. तर दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,700 ते 1,42,200 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि जागतिक स्तरावर डॉलर वधारल्यामुळे सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत, ज्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
advertisement
सोने खरेदीचा सर्वात शुभ मुहूर्त
गुढीपाडवा हा पूर्ण दिवस 'स्वयं सिद्ध मुहूर्त' असला, तरी आज सकाळी काही काळ अमावस्येचा प्रभाव असल्याने ज्योतिषतज्ज्ञांनी विशिष्ट वेळेत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी 06:54 वाजल्यापासून प्रतिपदा तिथी सुरू झाली आहे, त्यामुळे तुम्ही कधीही खरेदी करू शकता. पण हा वेळ तुमचा चुकला असेल तर द्रिक पंचांगानुसार, दुसरा शुभ मुहूर्त सायंकाळी 06:29 ते 06:53 पर्यंत आहे.
साडेतीन मुहूर्तांचे महत्त्व आणि सोने
हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या दिवशी घेतलेले सोने कधीही कमी होत नाही आणि ते घरामध्ये अक्षय राहते, अशी धार्मिक धारणा आहे. सोन्याला 'शुद्धता' आणि 'मंगल्याचे' प्रतीक मानले जाते. आजच्या घसरलेल्या दरांचा फायदा घेऊन अनेक ग्राहक सोन्याची नाणी, वेढे किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. यामुळे नवीन वर्षाची सुरुवात आर्थिक स्थिरतेने होते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
