हनुमानजींच्या 8 सिद्धी णि त्यांचे महत्त्व
अणिमा
या सिद्धीच्या जोरावर हनुमानजी स्वतःचे शरीर एका अणूइतके लहान करू शकतात. जेव्हा हनुमानजी लंकेत प्रवेश करत होते, तेव्हा 'सुरसा' नावाच्या राक्षसीने त्यांना अडवले. त्यावेळी त्यांनी स्वतःला अतिशय सूक्ष्म केले आणि तिच्या तोंडातून शिरून लगेच बाहेर आले. या सिद्धीचा वापर करून ते कोणत्याही कठीण जागेतून मार्ग काढू शकतात.
advertisement
महिमा
अणिमाच्या अगदी विरुद्ध म्हणजे 'महिमा'. या सिद्धीच्या सहाय्याने हनुमानजी आपले शरीर विशाल करू शकतात. लंकेत जाताना समुद्रावर जेव्हा त्यांनी स्वतःचे विराट रूप धारण केले होते, किंवा जेव्हा त्यांनी सूर्य गिळण्यासाठी विशाल रूप घेतले होते, तेव्हा त्यांनी 'महिमा' सिद्धीचा वापर केला होता.
गरिमा
या सिद्धीमुळे हनुमानजी आपल्या शरीराचे वजन अफाट वाढवू शकतात. ते इतके जड होऊ शकतात की जगातील कोणतीही शक्ती त्यांना हलवू शकत नाही.
महाभारताच्या काळात त्यांनी भीमाचा अहंकार मोडण्यासाठी वृद्ध वानराचे रूप धारण केले होते आणि भीमाला त्यांची शेपटी हलवता आली नाही. हे 'गरिमा' सिद्धीमुळे शक्य झाले.
लघिमा
लघिमा म्हणजे शरीराला कापसासारखे हलके करणे. या सिद्धीमुळे हनुमानजी हवेच्या वेगाने उडू शकतात आणि कोणत्याही गोष्टीवर वजनाशिवाय चालू शकतात. द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना त्यांनी या सिद्धीचा वापर करून स्वतःला आणि त्या पर्वताला हलके केले होते, जेणेकरून ते वेगाने उडू शकतील.
प्राप्ती
प्राप्ती सिद्धीमुळे व्यक्ती कोणत्याही ठिकाणी अदृश्यपणे प्रवेश करू शकते. तसेच, जगातील कोणतीही वस्तू क्षणार्धात प्राप्त करण्याची शक्ती यात असते. प्राण्यांच्या आणि पक्षांच्या भाषा समजून घेण्याची क्षमताही यातून मिळते.
प्राकाम्य
या सिद्धीमुळे हनुमानजी पृथ्वीच्या खोलवर किंवा आकाशात कुठेही भ्रमण करू शकतात. कोणतीही इच्छा मनात येताच ती पूर्ण करण्याची ताकद म्हणजे प्राकाम्य. यामुळे ते कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे रूप धारण करू शकतात.
ईशित्व
ईशित्व म्हणजे ईश्वरासारखे गुण प्राप्त करणे. या सिद्धीमुळे हनुमानजी निसर्गावर आणि इतर प्राण्यांवर आपले नियंत्रण मिळवू शकतात. सृष्टीच्या शक्तींना स्वतःच्या इच्छेनुसार चालवण्याची ताकद त्यांना यातून मिळते.
वशित्व
वशित्व म्हणजे दुसऱ्याला वश करणे. या सिद्धीच्या सहाय्याने हनुमानजी कोणाचेही मन जिंकू शकतात किंवा शत्रूला पराभूत करण्यासाठी त्याच्या बुद्धीवर नियंत्रण मिळवू शकतात. इंद्रियांवर ताबा मिळवणे ही देखील वशित्व सिद्धीची फलश्रुती आहे.
हनुमानजींना या शक्ती कशा मिळाल्या?
हनुमानजींना या 8 सिद्धी माता सीतेच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे प्राप्त झाल्या आहेत. परंतु, या सिद्धींचा वापर त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी केला नाही. त्यांनी प्रत्येक शक्तीचा वापर प्रभू श्रीरामाच्या कार्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी केला.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
