नेमका संभ्रम काय?
2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्चच्या सायंकाळपासून सुरू होत असली, तरी त्याच वेळी भद्रा काळ देखील सुरू होत आहे. शास्त्रात 'भद्रा' काळात होलिका दहन करणे अत्यंत अशुभ मानले जाते. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रहण काळात सुतक पाळावे लागत असल्याने पूजा-अर्चा करणे शक्य नसते. यामुळेच 2 मार्चच्या रात्री भद्रा असताना आणि 3 मार्चला ग्रहण असताना नेमकी होळी कधी पेटवावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
होलिका दहनाचे महत्त्वाचे मुद्दे आणि 12 मिनिटांचे रहस्य
केवळ 12 मिनिटांचा 'प्रदोष' मुहूर्त
काही पंचांगानुसार, 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 06:24 ते 06:36 या दरम्यान प्रदोष काळ आहे. या 12 मिनिटांच्या कालावधीत भद्रेचा मुख भाग सोडून होलिका दहन करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. हा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असल्याने वेळेचे पालन करणे आवश्यक ठरेल.
भद्रा काळाचे मोठे सावट
2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 वाजता भद्रा सुरू होईल, जी 3 मार्चच्या पहाटे 4:30 पर्यंत राहील. भद्रा काळात होळी पेटवल्याने कुटुंबावर किंवा गावावर संकट येऊ शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे भद्रा पुच्छ काळात पर्यायी मुहूर्त सांगितला जात आहे.
चंद्रग्रहणामुळे 3 मार्चला अडथळा
3 मार्च रोजी दुपारी 3:21 पासून चंद्रग्रहणाचे सूतक सुरू होईल. सायंकाळी 6:26 ते 6:46 या वेळेत ग्रहण दृश्यमान असेल. ग्रहण काळात अग्नी प्रज्वलित करणे किंवा धार्मिक विधी करणे शास्त्रात वर्ज्य असल्याने 3 मार्चचा संध्याकाळचा मुहूर्त धोक्यात आला आहे.
धुलिवंदन/धुळवड 4 मार्चला
चंद्रग्रहणाच्या सुतकामुळे 3 मार्चला रंग खेळणे शक्य होणार नाही. त्यामुळे देशभरात बुधवार, 4 मार्च 2026 रोजी धुलिवंदन साजरे केले जाईल. ग्रहणाचे शुद्धीकरण झाल्यानंतरच रंगांच्या उत्सवाला सुरुवात होईल.
धर्मसिंधू आणि निर्णयसिंधूचे मत
ज्योतिषांच्या मते, जर पौर्णिमा दोन दिवसांच्या प्रदोष काळात व्याप्त असेल आणि भद्रेचा अडथळा असेल, तर पहिल्या दिवशी भद्रा पुच्छ काळात किंवा भद्रा मुख सोडून प्रदोष काळात होळी पेटवणे शास्त्रसंमत ठरते.
शुभ मुहूर्ताचे महत्त्व
होळीच्या अग्नीतून सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि वाईटाचा नाश व्हावा, यासाठी मुहूर्ताची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. चुकीच्या वेळी केलेली होळी हानीकारक ठरू शकते, म्हणून या 12 मिनिटांच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
