देशभरात गजाननाची अशी अनेक मंदिरं आहेत, जिथे घडलेले चमत्कार सर्वत्र प्रख्यात आहेत. पुदुच्चेरीमध्ये असलेलं मनाकुल विनायगर मंदिरदेखील त्यापैकीच एक. असं म्हणतात की, फ्रेंच लोकांनी या मंदिरातील मूर्ती पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्येकवेळी ही मूर्ती आपल्या स्थानी येऊन पुन्हा स्थापित झाली. हा चमत्कार आहे की अंधश्रद्धा याबाबत अद्याप कुठेही पुरावा आढळलेला नाही, मात्र येथील गणपतीवर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे. शिवाय या मंदिराची रचनादेखील भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते.
advertisement
बाप्पाच्या आरतीत आठवणीने ठेवा 'या' वस्तू
मंदिराच्या भिंतींवर बाप्पाच्या जन्मापासून विवाहापर्यंत सर्व प्रसंग अतिशय सुरेखरित्या कोरलेले आहेत. शास्त्रात गणपतीच्या ज्या 16 रूपांचा उल्लेख आहे, ते सर्व रूपदेखील या भिंतींवर पाहायला मिळतात. मंदिरासमोरच समुद्र असल्यामुळे येथील बाप्पाला भुवनेश्वर गणपतीदेखील म्हटलं जातं. शिवाय तामिळ भाषेत मनल म्हणजे वाळू आणि कुलन म्हणजे सरोवर. प्राचीन कथांनुसार फार पूर्वी या मंदिराच्या अवतीभोवती वाळू होती, म्हणूनच मंदिराला नाव पडलं 'मनाकुला विनायगर'.
जवळपास 8 हजार वर्ग फूट क्षेत्रात हे मंदिर वसलं आहे. मंदिराच्या आतील सुबक नक्षीकामात सोन्याचा वापर करण्यात आल्याचं म्हटलं जातं. शिवाय बाप्पाच्या प्रमुख मूर्तीव्यतिरिक्त त्याच्या 58 मूर्तीदेखील इथे स्थापित आहेत. बाप्पासाठी 10 फूट उंच भव्य रथही आहे. या रथासाठी जवळपास साडेसात किलो सोन्याचा वापर करण्यात आला होता, असं म्हटलं जातं.