मुंबई – हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी, म्हणजेच नवव्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते. यंदा ही रामनवमी आज म्हणजेच 6 एप्रिल 2025 रोजी रविवारी साजरी केली जात आहे. भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. भाविक या दिवशी विधिवत पूजन, उपवास आणि रामनामाचा जप करतात. ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप अनेकजण करतात. याच मंत्राबाबत बोरिवलीतील धर्म अभ्यासक प्रभा माने यांनी माहिती दिलीये.
advertisement
रामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र आणि त्याचे महत्त्व
धार्मिक अभ्यासक प्रभा माने (बोरिवली) यांच्या माहितीनुसार, 'श्री राम जय राम जय जय राम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र राम भक्तांसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. समर्थ रामदास स्वामी यांनी या मंत्राचा 13 कोटी वेळा जप करून त्यानंतरच कार्यास आरंभ केला होता. त्यांनी रामाला सद्गुरू मानले. समर्थ दररोज फक्त पाच घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य श्रीरामाला अर्पण करत. त्यांनी या मंत्राला तारक मंत्र म्हणून सिद्ध केलं. पुढे गोंदवलेकर महाराजांनी हा मंत्र सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य हाती घेतले आणि आजही ही सेवा अखंड सुरू आहे.
Ram Navami 2025: जीवनात येईल समृद्धी! रामनवमीला अशी करा पूजा, पाहा मुहूर्त आणि विधी
मंत्रामागील आध्यात्मिक अर्थ
श्री राम या नावाचा अर्थ देखील खोल आहे – ‘श्री’ म्हणजे माता सीता, ‘रा’ म्हणजे अग्नितत्त्व आणि ‘म’ म्हणजे जलतत्त्व. त्यामुळे या मंत्राचा जप केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात, अशी श्रद्धा आहे.
रामनवमी साधना कशी करावी ?
रामनवमी निमित्त भाविकांनी ‘श्री राम जय राम जय जय राम’ या मंत्राचा जप, रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. साधनेसाठी तुळशीच्या माळेवर जप करावा. आसन घालून, मन एकाग्र करून मंत्रजप करत बसावं. या दिवशी साधना केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी, नोकरवर्ग आणि सर्वांना फलश्रुती प्राप्त होते.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.