तपोवनातील या विशेष मंदिराबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई सांगतात की, या संस्थेत असणारी प्रत्येक वास्तू ही आमच्या माय माऊलींच्या उद्देशाने उभारण्यात आली आहे. विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथील 388 एकर परिसरात 14 मंदिर आहेत. त्याचबरोबर आणखी मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे इथे असणाऱ्या रुग्णांना एकटेपणाची भावना येत नाही. तपोवनातील हे महादेवाचं मंदिर आधी अगदी छोटंसं होतं. त्याची स्थापना 1946 संस्थेच्या स्थापनेनंतर करण्यात आली होती. त्यांनतर काही वर्षांनी त्याचे बांधकाम करण्यात आले. सामान्यतः महादेवाची सर्वाधिक मंदिर ही हेमाडपंती पद्धतीने बांधलेली असतात. पण, हे एक आगळं वेगळं मंदिर आहे.
advertisement
जपानी शैलीतील मंदिराची संकल्पना
तपोवनमधील रुग्णाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली. त्यातीलच एक म्हणजे शिवाजीराव पटवर्धन यांच्या कन्या श्रीमती अनुताई भागवत. त्या 1971-72 मध्ये या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी जपानला गेल्या होत्या. त्याठिकाणी जाऊन त्यांनी अनेक बाबींचा अभ्यास केला. जपानमध्ये असताना तेथील मंदिरं त्यांना बघायला मिळाली. त्या मंदिराची रचना अतिशय सुबक आणि आकर्षक होती. त्यांच्या मनाला ती भावली. त्यानंतर त्या जेव्हा परतल्या तेव्हा त्यांच्या मनात आलं की, आपल्या तपोवनात सुद्धा त्या शैलीतील मंदिर असावं. त्यानंतर अनुताई यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात आलं. तेव्हा महादेवाचं लहान मंदिर त्याठिकाणी होतं. या मंदिराची स्थापना 1946 मध्ये झाली असली तरीही जपानी शैलीतील मंदिर हे 1974-75 मध्ये बांधण्यात आले, अशी माहिती सुभाष गवई यांनी दिली.
मंदिराचं वैशिष्ट्य काय?
तपोवनातील हे मंदिर जपानी मॉडेलमध्ये तर आहेच. पण नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय? तर या मंदिराचं छत हे तीन स्तरावर बांधण्यात आलं आहे. ते स्तर मंदिराची शोभा वाढवतात. जपानमधील मंदिरात पाच स्तर असतात. ते म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश याचं प्रतीक असल्याचं मानलं जातं. तपोवनातील हे तीन स्तर असलेलं छत हे 14 खांबांवर उभारण्यात आलं आहे. त्याचबरोबर या मंदिरात नंदीचे दर्शन देखील घडते. येथील महादेवाची पिंड ही पितळेची आहे. त्याचबरोबर या मंदिराचे नक्षीकाम देखील अगदी बारीक केलेले आहे, असे सुभाष गवई सांगतात.