कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम शेजारी आणि छत्रपती शाहू स्टेडियमला लागूनच हे रावणेश्वर मंदिर आहे. 2014 साली झालेल्या जीर्णोद्धारानंतर सध्या हे मंदिर आत्ताच्या काळातील वाटत असलं तरी इथले मूळ स्थान हे अगदी पुरातन आहे. पूर्वी इथे असणाऱ्या रावणेश्वर तलावावरुन येथील शिवलिंगाला रावणेश्वर अशी ओळख निर्माण झाली आहे.
काय आहे मंदिराचं महात्म्य ?
advertisement
खरंतर कोल्हापुरातील पूर्वीच्या पद्मालयाच्या काठावर श्री नरसिंह, कात्यायनीजवळ परशुराम आणि गोकुळ शिरगाव क्षेत्री श्रीकृष्ण अशा या अवतार परंपरेत मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचे देखील या क्षेत्री आगमन झाले होते. आपल्या पदस्पर्शानी पावन केलेले हे पवित्र क्षेत्र म्हणजे श्री रावणेश्वर मंदिर. करवीर महात्म्य या पवित्र ग्रंथात असा उल्लेख येतो कि, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण सीतामाता वनवासात असताना करवीर क्षेत्री आल्या समयी त्यांना दशरथ राजाला पिंडदान करण्याची वेळ आली. त्यावेळी अन्य काही साधन न मिळाल्याने सीता मातेने वाळूचे पिंड तयार करून ते जवळच वाहणाऱ्या जयंती नदीत प्रवाहित केले. माता सीतेचा श्रद्धाभाव आणि करवीर क्षेत्राच्या अगाध प्रभावामुळे दशरथ राजा तृप्त होऊन मोक्षास गेला.
भगवान श्रीकृष्णाचं कोल्हापूर कनेक्शन, महाभारतातील ही ठिकाणं माहितीयेत का?
वास्तविक पाहता पिंडदानाचा अधिकार पुत्राचा आणि शास्त्र विधानाप्रमाणे तो पिंड हा सातूच्या पिठाचा किंवा भाताचा हवा. मात्र एका स्त्रीच्या हातून वाळूच्या पिंडदानाने सासऱ्याला मोक्ष मिळणे, ही गोष्ट करवीर महात्म्यात स्पष्ट करणारी आहे. त्यामुळेच करवीर क्षेत्राचे हे महात्म्य जाणून प्रभू रामचंद्रांनी इथल्या एका तीर्थाच्या काठावर स्वतःच्या नावे आणि लक्ष्मणाने आपल्या नावे अशी दोन लिंगे स्थापन केली. सध्या रावणेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जे लिंग आहे ते रामेश्वर लिंग तर मंदिराच्या आवारात जे बाहेर लिंग आहे ते लक्ष्मणेश्वर लिंग होय. तसेच पूर्वी इथे असणाऱ्या तीर्थाला सीता तीर्थ म्हणून ओळखले जात असे. काळाच्या ओघात इथे असणाऱ्या तळ्याला रावणेश्वर तळ्याकाठी असणाऱ्या रामेश्वरालाच लोक रावणेश्वर म्हणू लागले आहेत, असे मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
कशी आहे रचना ?
1984 मध्ये फक्त चार खांबांचे असणारे हे पुरातन मंदिर जीर्णोद्धारनंतर भव्य स्वरूपात बांधण्यात आले आहे. आता या मंदिराची रचना शिवलिंग आकारामध्ये करण्यात आली आहे. मंदिराच्या पूर्वेकडे भगवान शंकराचे संपूर्ण कुटुंब, दक्षिणेला शिवअराधना करणारा रावण, पश्चिमेला भगवान महादेव नटेश्वर रुपात आणि उत्तरेला पंचमुखी अर्थात सदाशिव रुपात भगवान शंकर अशा प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारावरती आपणास श्रीशिवशंकराची ध्यानस्थ मूर्ती पहावयास मिळते. तर मंदिराच्या संरक्षक भिंतीवर बारा ज्योतिर्लिंगाची शिल्पे पाहायला मिळतात. ही शिल्पे पाहत मंदिराच्या परिसरात येतानाच दोन स्तंभांवर शृंगी आणि भृंगी हे दोन शिवगण दिसतात. विशेष म्हणजे हे 3 पायांचे असून यातील कुठलाही एक पाय झाकला असता, उरलेल्या दोन पायांनी नृत्यमुद्रा दिसते.
'लालबागच्या राजा'चं कोल्हापूर कनेक्शन, 1980 पासून आहे खास परंपरा
मुख्य दाराच्या दोन बाजूला काचेमध्ये आपणास उजवीकडे विरभद्र तर डावीकडे भैरवाचे चित्र दिसते. पुढे येताच कोपऱ्यात गंगा आणि गौरी यांच्या मूर्ती भिंतींवर कोरण्यात आलेल्या दिसतात. त्याच्याच वर भिंतीवर मंदिराची जिर्णोद्धारापूर्वीची आणि नंतरची परिस्थिती चित्ररुपात पाहायला मिळते. तर गाभऱ्याकडे तोंड करून नमस्कार केलेल्या त्रिजठा या रावणाच्या दासीचे शिल्प देखील इथे पाहायला मिळते. सीतामाई अशोक वनात असता तिने प्राणपणाने त्यांचे रक्षण केले होते. या त्रिजठेपुढे नंदी आणि त्यापुढे गर्भागाराच्या दारात उजवीकडे श्री मारुती तर डावीकडे श्री गजानन विराजमान आहेत. गाभाऱ्यात पूर्वाभिमुख शिवलिंग असून त्याची नाळ उत्तरेला आहे. दक्षिण भारतातील रामेश्वराप्रमाणेच चौकोनी पिठाकेत रामेश्वर लिंग आहे. लक्ष्मी विजय ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे करवीर क्षेत्री बारा ज्योतिर्लिंगाची जी स्थाने आहेत, त्यामध्ये रामेश्वराचे स्थान म्हणजेच हे देवालय होय, असेही उमाकांत राणिंगा यांनी स्पष्ट केले.
पुढे गाभाऱ्यातून बाहेर पडताच एका बाजूला सीतामाता वाळूचे पिंड तयार करीत असून त्यांना राम, लक्ष्मण व हनुमान सहाय्य करीत असलेले उठावदार शिल्प पाहायला मिळते. पुढे गेल्यावर अमरनाथ गुफांची व हिमलिंगाची प्रतिकृती तिथेच लक्ष्मणेश्वर लिंग आणि श्री गणेशाची मूर्ती आहे.
दरम्यान, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे लिंगाजवळ चंडेश गणाची स्थापना केल्याने निर्माल्य दोष नाहीसा झालेला आहे. त्यामुळे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते. तर या मंदिराचे सर्वात अधिक लक्ष वेधणारे वैशिष्ट म्हणजे याचे शिखर आहे. त्यामुळे एकदा तरी कोल्हापुरातील या पुरातन आणि पवित्र क्षेत्राला भेट दिलीच पाहिजे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





