सोलापूर: महाराष्ट्रातील गावोगावी होणाऱ्या यात्रांशी काही आख्यायिका आणि ऐतिहासिक परंपरा जोडल्या गेलेल्या असतात. सोलापूरमधील प्रसिद्ध गड्ड्याची यात्रा हा सोलापूरकरांसाठी अतिशय भावनिक विषय आहे. सोलापूरकर कुठेही असले तरी दरवर्षी या यात्रेसाठी आवर्जून येतात. या यात्रेला तब्बल 900 वर्षांची परंपरा असून श्री सिद्धेश्वरांचा पालखी सोहळा म्हणजेच गड्डा यात्रा होय.
यात्रेला 900 वर्षांचा इतिहास
advertisement
गड्ड्याच्या यात्रेला तब्बल 900 वर्षांचा इतिहास लाभला आहे. सिद्धेश्वर महाराजांचा पालखी यात्रा महोत्सव म्हणजेच ही गड्डा यात्रा होय. या यात्रेमुळेच सोलापूर शहराची आज एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सोलापुरातल्या होम मैदानावर ही यात्रा भरते. या यात्रेला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश अशा विविध राज्यातले लोक येतात. या यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे, इथं काढली जाणारी नंदिधवजांची मिरवणूक आहे. संपूर्ण रस्त्यांवर काढली जाणारी आकर्षक रांगोळी, यात्रेत आलेले उंच उंच आकाशी पाळणे, होम मैदानात थाटलेली दुकानं, मौत का कुवा सारखे थरारक शो हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असतं.
गरिबांच्या विठ्ठलाला 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण, किंमत किती? पहा लेटेस्ट PHOTOS
सर्वधर्म समभावाचं अनोखं उदाहरण
सिद्धेश्वर महाराज म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. सगळ्याच धर्माच्या लोकांच्या मनात भरपूर श्रद्धा आहे. त्यामुळे ही यात्रा म्हणजे सर्व धर्म समभावाचं उत्तम उदाहरण आहे. कारण या यात्रेत सगळ्या धर्माचे, पंथांचे लोकं एकत्र येतात. ही यात्रा आणि माहाराजांचा पाळखी सोहळा साजरा करतात. हे गाव महाराजांनीच वसवल्याचं म्हटलं जातं.
सिद्धेश्वर महाराजांचं मोठं योगदान
सिद्धेश्वर महाराजांनी गावात अनेक सामाजिक कामं केली. सामाजिक सुधारणा करताना त्यांनी परिश्रमाला जास्त महत्त्व दिलं. पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांनी सामूहिक श्रमदानातून तलावांची निर्मिती केली. सोलापूरच्या पंचक्रोशीत 68 शिवलिंगांसह अष्टविनायक आणि अष्टभैरवांची प्रतिष्ठापना केली. सामूहिक विवाह सोहळे पार पाडले. या देवस्थानाकडून आजही सामाजिक कार्य केलं जातं. याच कारणामुळं कोणतीही जात, धर्म, पंथ याचा भेद न करता प्रत्येक सोलापूरकरांची नाळ या ग्रामदेवतेशी जुळलेली आहे.
भाविक आतुरतेने पाहतात वाट
गड्डा यात्रा ही खेळणी विकणाऱ्या, खाऊ विकणाऱ्या कष्टकऱ्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे. त्यामुळं लोक अगदी वर्षभर या यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. यात्रेला एवढं महत्तव असतं की चक्क मुलांना शाळेला सुट्ट्या दिल्या जातात. सोलापुरातील इंग्रजी माध्यमातील मुलांना नाताळाची सुट्टी आणि मराठी माध्यमातील मुलांना गड्ड्याची सुट्टी असते. मुख्य म्हणजे यंदाची गर्दी पाहता यात्रेचे दिवसही वाढवण्यात आले आहेत.





