सासनकाठी ही सुमारे 40 ते 45 फूट उंचीची जाड वेळुची (कळकाची) असते. हा कळक आणताना आणि निवडताना विशिष्ट प्रकारे पारख आणि पूजा विधी केला जातो. प्रत्येक सासनकाठीचं निशाण हे वेगवेगळे असतं. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो, त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त संत नावजीनाथांनाच किंवा काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो.
advertisement
या मिरवणुकीमध्ये क्रमवारीने पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे उर्फ सिंधिया सरकार, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या 18 शासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या 57 आणि इतर 29 अशा एकूण 96 सासनकाठ्या सहभागी असतात.
दरवर्षी अशी पार पडते यात्रा
चैत्र पौर्णिमे दिवशी देवाचा शासकीय महाभिषेक हा पहाटे 4 ते 6 या वेळेत केला जातो. त्यानंतर महावस्त्रासह महापूजा केली जाते. पुढे दुपारी 12 वाजण्याच्या आत धुपारती त्याचबरोबर पंचारती केली जाते. त्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी साधारण 1 वाजता सुरू होते. संध्याकाळी जोतिबा देवाची पालखी यमाई मंदिराकडे जाते. पुढे सुर्यास्तानंतर यमाई मंदिरासमोर सदरेवर देवाची पालखी विराजमान होते. यानंतर यमाई आणि जमदग्नी यांचा (पालखीतील कट्यार) प्रतिकात्मक विवाहसोहळा पार पडतो. सर्व विधी पार पडल्यानंतर देवाची पालखी परत येऊन सदरेवर विराजमान होते. त्यानंतर स्तोत्रयुक्त पदांचे गायन, सर्व मानकऱ्यांना पानविडा, तोफेची सलामी देऊन पालखी सोहळ्याची सांगता होते. तर या दिवशी रात्री जोतिबा देवाला विशेष महास्नानही घालण्यात येते, अशी माहिती प्रसन्न मालेकर यांनी सांगितली.





