Kolhapur Jyotiba Yatra : दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत का केली जाते गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, काय आहे कारण? Video

Last Updated:

येत्या 12 एप्रिल रोजी ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा सोहळा संपन्न होणार आहे. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी अर्धा तास ज्योतिबा डोंगरावर ही यात्रा संपन्न होणार आहे.

+
चैत्र

चैत्र यात्रेची परंपरा 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र जोतिबा हे तीर्थक्षेत्र पुन्हा एकदा भक्तिमय उत्साहात न्हाऊन जाणार आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्यात भरत असलेली जोतिबा देवाची चैत्र यात्रा यंदा 12 एप्रिल रोजी मुख्य सोहळ्यासह साजरी होणार आहे. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्याची उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल होत असतात. गुढीपाडवा संपताच जोतिबा डोंगरावर यात्रेचा उत्साह दिसू लागतो, हलगी, पिपाणी आणि सनईच्या सुरांवर नाचणाऱ्या सासनकाठ्यांनी परिसर अक्षरशः हर्षोल्हासात न्हाऊन जातो. या चैत्र यात्रे मागील परंपरा आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासंदर्भात मंदिर आणि शास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
यात्रेचा भक्तिमय थाट
या वर्षीही जोतिबा चैत्र यात्रेचा थाट पाहण्यासारखा आहे. हत्ती, उंट, तोफागाडे, भालदार आणि चोपदार यांच्या लवाजम्यासह सजलेल्या सासनकाठ्यांच्या मिरवणुकीने जोतिबा डोंगर दुमदुमून गेला आहे. सुमारे 7 ते 8 लाख भाविक या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता असून, या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी दूरदूरहून भाविकांनी हजेरी लावली आहे. जोतिबा डोंगरावर गुलालाचा वर्षाव, सासनकाठ्यांचा नाच आणि भक्तांचा उत्साह यामुळे हा परिसर एका अनोख्या आनंदात बुडाला आहे.
advertisement
चैत्र यात्रेची पौराणिक कथा
जोतिबा चैत्र यात्रेमागील पौराणिक कथा केदार विजय या ग्रंथाशी जोडली जाते. मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ दुष्टांचा संहार करून हिमालयात परतत असताना करवीर निवासिनी अंबाबाईच्या विनंतीवरून ते वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर थांबले. तेव्हापासून जोतिबा, ज्याला ‘दख्खनचा राजा’ म्हणूनही ओळखले जाते, या ठिकाणी विराजमान झाले. मात्र, या सोहळ्यास यमाई माता उपस्थित नव्हती, ज्यामुळे तिचा राग अनावर झाला. यमाईच्या समजुतीसाठी जोतिबा औंध येथे गेले, परंतु तिथेही तिचा राग शांत झाला नाही. त्यावेळी जोतिबाला परशुराम अवतारातील वचन आठवले, ज्यात त्यांनी केदार अवतारात यमाई आणि जमदग्नी यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.
advertisement
या वचनानुसार, जोतिबाने खड्गरूपातील जमदग्नी यांना पुन्हा अवतीर्ण होण्याची विनंती केली आणि महर्षी जमदग्नी व माता रेणुका (यमाई) यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. सुरुवातीला तीन वर्षे हा सोहळा औंध डोंगरावर साजरा झाला. नंतर यमाईने स्वतः जोतिबाला सांगितले की, ती चैत्र यात्रेसाठी वाडी रत्नागिरी येथे येईल. त्यानुसार, यमाई चाफेबनात प्रकट झाली आणि तेव्हापासून दरवर्षी चैत्र यात्रेची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून या यात्रेत गुलाल आणि खोबऱ्याची उधळण केली जाते.
advertisement
यात्रेचा मुख्य सोहळा
यात्रेच्या मुख्य दिवशी, म्हणजेच 12 एप्रिल रोजी, पहाटे 5 ते 6 या वेळेत शासकीय महाभिषेक पार पडेल. यानंतर महावस्त्र आणि महापूजा होतील. दुपारी 12 वाजण्यापूर्वी धुपारती आणि पंचारती केली जाईल, तर दुपारी 1 वाजता सासनकाठ्यांची भव्य मिरवणूक सुरू होईल. संध्याकाळी जोतिबा देवाची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करेल आणि सूर्यास्तानंतर यमाई मंदिरासमोर पालखी विराजमान होईल. यावेळी यमाई आणि जमदग्नी (पालखीतील कट्यार) यांचा प्रतिकात्मक विवाहसोहळा संपन्न होईल. सर्व विधींनंतर पालखी परत मंदिरात येईल आणि स्तोत्रयुक्त पदांचे गायन, मानकऱ्यांना पानविडा आणि तोफेची सलामी देऊन सोहळ्याची सांगता होईल. रात्री जोतिबा देवाला विशेष महास्नान घातले जाईल.
advertisement
सासनकाठ्यांचे महत्त्व
जोतिबा चैत्र यात्रेचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे सासनकाठ्या. या 30 ते 40 फूट उंचीच्या काठ्यांवर जोतिबाचे वाहन ‘घोडा’ बसवलेले असते. सासनकाठ्या खांद्यावर घेऊन नाचणे आणि तोरण्या सांभाळणे हे कौशल्याचे काम असते. भाविक आपापल्या गावातून या काठ्या घेऊन पायी चालत जोतिबा डोंगरावर येतात. यंदा असंख्य सासनकाठ्यांपैकी 108 काठ्या मानाच्या असून, त्यांना देवस्थान समितीतर्फे क्रमाने मानपान दिले जाणार आहे, अशी माहिती ॲड. मालेकर यांनी दिली.
advertisement
प्रशासनाची तयारी
या वर्षीच्या यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, पोलिस आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कसोशीने तयारी केली आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जोतिबा चैत्र यात्रेत सहभागी होणारे भाविक आपली श्रद्धा आणि उत्साह यांचा अनोखा संगम दाखवत आहेत. गुलालाची उधळण, सासनकाठ्यांचा नाच आणि जोतिबाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा यामुळे संपूर्ण डोंगर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. ही यात्रा केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे.
advertisement
जोतिबा चैत्र यात्रा 2025 हा भक्ती, परंपरा आणि आनंदाचा महासंगम ठरणार आहे. दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी लाखो भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी दाखल झाले असून, ‘चांगभलं’च्या जयघोषात हा सोहळा अविस्मरणीय ठरेल, यात शंका नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Kolhapur Jyotiba Yatra : दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत का केली जाते गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, काय आहे कारण? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement