हिरवा रंग हे ताजेपणा, टवटवीतपणा, निसर्ग, सकारात्मकता यांचं प्रतीक आहे. निसर्गात हिरव्या रंगाच्या अनेक छटा एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच निसर्गाच्या सान्निध्यात मन नेहमी प्रफुल्लित होतं. हीच प्रसन्नता लग्नसंस्कारात अनुभवता यावी, स्त्रियांच्या आयुष्यात व पर्यायानं त्यांच्या संसारात रुजावी अशा उद्देशानं लग्नात हिरवा चुडा घातला जातो. भारतात विविध ठिकाणी लग्नाच्या पद्धती व परंपरा वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी वधू लाल रंगाचा चुडाही घालते; मात्र महाराष्ट्रात व इतर काही ठिकाणी वधू, तसंच तिच्या इतर नातेवाईक स्त्रिया हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात.
advertisement
स्त्रियांनी बांगड्या घालणं हे शुभ समजलं जातं. हिंदू धर्मानुसार बांगड्या नवरीचं वाईट नजरेपासून संरक्षण करतात. त्यामुळे अगदी लहान वयापासून मुलींना बांगड्या घालण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. आता तो फॅशनचाही एक भाग आहे. लग्नामध्ये मात्र विशेषकरून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. जसा लाल रंग सौभाग्याचं प्रतीक समजला जातो, तसाच हिरवा रंगही सौभाग्याचं प्रतीक समजला जातो. त्यामुळे लग्नात हिरव्या रंगाला महत्त्व आहे.
हिरवा रंग संपन्नता दर्शवतो. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे वधूचा संसार प्रेम, सुख आणि समृद्धीनं भरलेला राहील असा त्यामागचा उद्देश असतो. वधूला तिच्या पुढच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये असा त्यामागचा अर्थ असतो. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या केवळ विवाहित स्त्रियांनाच घातल्या जातात. स्त्रियांच्या प्रजननक्षमतेचं व त्यांना मिळालेल्या मातृत्वाच्या देणगीचं हे एक प्रतीक मानलं जातं.
लग्नानंतर नववधू जवळपास 40 दिवस हिरव्या काचेच्या बांगड्या घालते. विविध भागात याबाबत विविध परंपरा आहेत. हिरवा रंग सौभाग्याचं लेणं आणि शुभसंकेत असतो. त्यामुळे नववधू हिरवा चुडा घालते. हिंदू धर्मात इतरही अनेक शुभ प्रसंगांत हिरव्या रंगाला महत्त्व दिलेलं आहे. विविध प्रसंगांत स्त्रिया हिरवी साडी परिधान करतात. सकारात्मकता, नवनिर्मिती, ताजेपणा, सुख-समृद्धी यांचं प्रतीक असणारा हा हिरवा रंग नववधूच्या रूपातून तिच्या संसारात सुख घेऊन येतो अशा त्यामागच्या भावना असतात.