समुद्र मंथन आणि 'हलाहल' विष
पौराणिक कथेनुसार, जेव्हा देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून अनेक रत्ने बाहेर आली. मात्र, सर्वात आधी अत्यंत भयानक आणि विनाशकारी 'हलाहल' नावाचे विष बाहेर आले. हे विष इतके जहाल होते की त्यातून निघणाऱ्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड जळून खाक होऊ लागले असते. सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान शिवाने ते विष प्राशन केले.
advertisement
भांग आणि धतुऱ्याचा औषधी उपयोग
असे मानले जाते की, महादेवाच्या शरीरातील ही उष्णता कमी करण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी देवांनी त्यांच्यावर जल अर्पण केले. आयुर्वेदानुसार भांग आणि धतुरा हे गुणधर्माने शीतल मानले जातात. विषाचा दाह कमी करण्यासाठी देवांनी महादेवाला भांग आणि धतुरा अर्पण केला. यामुळे महादेवाच्या शरीरातील उष्णता शांत झाली आणि त्यांना आराम मिळाला. तेव्हापासून महादेवाला भांग आणि धतुरा अत्यंत प्रिय झाले.
भांग: एकाग्रता आणि वैराग्याचे प्रतीक
भांग केवळ नशा म्हणून नव्हे, तर अध्यात्मात ती 'एकाग्रतेचे' साधन मानली जाते. शिव हे महायोगी आहेत, जे सतत ध्यानात मग्न असतात. भांग ही मनातील चंचलता कमी करून अंतर्मुख होण्यास मदत करते, अशी धारणा आहे. भगवान शिव हे जगातील सर्व अशा गोष्टींचा स्वीकार करतात ज्यांना समाज 'वर्ज्य' किंवा 'टाकाऊ' मानतो, हे त्यांच्या अलिप्ततेचे लक्षण आहे.
'विजया' - भांगेचे आध्यात्मिक नाव
तंत्रशास्त्र आणि काही पुराणांमध्ये भांगेला 'विजया' असे म्हटले आहे. ही वनस्पती केवळ विषाचा प्रभाव कमी करण्यासाठीच नाही, तर साधकाला समाधीच्या अवस्थेपर्यंत नेण्यासाठी देखील साहाय्यक मानली जाते. म्हणूनच महाशिवरात्री किंवा श्रावण सोमवारी महादेवाला भांग अर्पण करून भक्त त्यांचे आशीर्वाद घेतात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
