आपल्या सूर्यमालेत एक अत्यंत दुर्मिळ आणि गूढ असा अंतराळातील पाहुणा येत असल्याने शास्त्रज्ञांचे लक्ष पूर्णपणे अवकाशाकडे लागले आहे. कधी संभाव्य धोका तर कधी मोठी संधी म्हणून पाहिला जाणारा हा रहस्यमय धूमकेतू आता पृथ्वीच्या तुलनेने जवळून जाणार आहे. 3I/ATLAS नावाचा हा धूमकेतू 19 डिसेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार असून, शास्त्रज्ञांसाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेच्याबाहेरून आलेला असून, काही काळ इथे फिरल्यानंतर पुन्हा अंतराळाच्या खोल भागात निघून जाणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेसाठी जणू “एलियन”च आहे.
advertisement
या धूमकेतूचा शोध 1 जुलै रोजी चिलीमध्ये असलेल्या नासाने निधी दिलेल्या ATLAS दुर्बिणीद्वारे लागला होता. 3I/ATLAS हा आतापर्यंत ओळखला गेलेला तिसरा इंटरस्टेलर (सूर्यमालेबाहेरील) ऑब्जेक्ट आहे. यापूर्वी 2017 मध्ये 1I/ओउमुआमुआ आणि 2019 मध्ये 2I/बोरिसोव हे असेच बाहेरील धूमकेतू पाहायला मिळाले होते. शास्त्रज्ञांच्या मते, 3I/ATLAS चा मार्ग स्पष्टपणे दाखवतो की तो आपल्या सूर्यमालेत तयार झालेला नाही, तर तो दुसऱ्या एखाद्या ताऱ्याभोवती निर्माण होऊन आता काही काळासाठी आपल्या परिसरातून जात आहे.
पृथ्वीला धोका आहे का?
युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या माहितीनुसार, 3I/ATLAS पृथ्वीपासून सुमारे 1.8 खगोलीय एकक (AU) अंतरावरून जाणार आहे. हे अंतर जवळपास 27 कोटी किलोमीटर आहे, म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतराच्या सुमारे दुप्पट. त्यामुळे हा धूमकेतू पृथ्वीला कोणताही धोका निर्माण करत नाही, असे शास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगत आहेत.
तरीही हा धूमकेतू शास्त्रज्ञांसाठी अत्यंत मौल्यवान संधी ठरणार आहे. जेव्हा 3I/ATLAS सूर्याच्या जवळ येतो, तेव्हा त्याची बर्फाळ पृष्ठभाग गरम होतो आणि त्यातून वायू व धूळ बाहेर पडते. या कणांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना इतर ताऱ्यांच्या आसपास धूमकेतू कसे तयार होतात, तसेच ग्रहांच्या सुरुवातीच्या रचनेविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते.
या धूमकेतूवर नासाच नव्हे तर संयुक्त राष्ट्रांचीही नजर आहे. ‘लाइव्ह सायन्स’च्या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल अॅस्टेरॉइड वॉर्निंग नेटवर्क (IAWN) ने 3I/ATLAS संदर्भातील निरीक्षण मोहिमेचे सुमारे अर्धे काम पूर्ण केले आहे. या नेटवर्कमध्ये जगभरातील शास्त्रज्ञ सहभागी असून, ते पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या धूमकेतू आणि लघुग्रहांवर सतत संशोधन करतात. नासा, IAWN आणि विविध निरीक्षण मोहिमांमधील समन्वय साधण्याचे काम करत आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष या धूमकेतूकडे लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील अंतराळ संस्था आणि वेधशाळा या इंटरस्टेलर धूमकेतूवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अलीकडेच हबल स्पेस टेलिस्कोप आणि JUICE जुपिटर मिशन यांनी काढलेली छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. ज्यामध्ये हा धूमकेतू सूर्यमंडलात वेगाने पुढे जाताना दिसतो. 3I/ATLASसारखे इंटरस्टेलर धूमकेतू फारच क्वचित दिसतात. त्यामुळे ते शास्त्रज्ञांना आपली सूर्यमाला आणि संपूर्ण ब्रह्मांड यांच्यातील नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची एक दुर्मिळ संधी देतात.
