आपल्या सूर्यमालेत पृथ्वीव्यतिरिक्त कुठे तरी जीवन असू शकते का, हा प्रश्न माणसाला शेकडो वर्षांपासून पडलेला आहे. आता या प्रश्नाला उत्तर मिळण्याची नवी आशा गुरू ग्रहाच्या बर्फाच्छादित चंद्र ‘युरोपा’ मुळे निर्माण झाली आहे. युरोपाच्या पृष्ठभागावर वैज्ञानिकांना एक विचित्र आणि थोडासा भयानक दिसणारा कोळी सारखा मोठा ठसा आढळून आला आहे.
हा ठसा पाहिल्यावर जणू एखाद्या प्रचंड जीवाने बर्फावर ओरखडे काढले आहेत किंवा एखादा विशाल कोळी तिथे रांगत गेला आहे, असा भास होतो. हा ठसा नासाच्या गॅलिलिओ स्पेसक्राफ्टने अनेक वर्षांपूर्वी टिपला होता. मात्र आता त्यामागचं रहस्य उलगडू लागलं आहे.
advertisement
वैज्ञानिकांच्या मते, हा ठसा युरोपाच्या बर्फाखाली पाण्याचा महासागर हालचाल करत असल्याचा पुरावा असू शकतो. आणि जिथे पाणी आहे, तिथे जीवनाची शक्यताही असते. या रहस्यमय ठशाला वैज्ञानिकांनी ‘डम्हान अल्ला’ असे नाव दिले आहे. आयरिश भाषेत याचा अर्थ ‘कोळी’ किंवा ‘भिंतीचा राक्षस’ असा होतो.
हा ‘भिंतीचा राक्षस’ नेमका आहे तरी काय?
1990च्या दशकाच्या अखेरीस गॅलिलिओ स्पेसक्राफ्ट गुरु आणि त्याच्या चंद्रांचा अभ्यास करत होता. तेव्हा युरोपावरील मनन्नान क्रेटर जवळ एक वेगळाच नमुना दिसला. तो ताऱ्यासारखा पसरलेला होता, जणू एखादा तारा फुटल्यावर जसा आकार दिसतो तसा.
आता ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन येथील वैज्ञानिकांनी या ठशामागचं विज्ञान स्पष्ट केले आहे. हा ठसा उल्कापातामुळे तयार झाला नसून, युरोपाच्या आतल्या भागात सुरू असलेल्या हालचालींमुळे तयार झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बर्फाखाली उकळतंय का पाणी?
हा कोळीसारखा ठसा समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील एक उदाहरण अभ्यासले. पृथ्वीवर बर्फाच्छादित तलावांमध्ये कधी कधी ‘लेक स्टार्स’ नावाचे नमुने तयार होतात. जेव्हा गोठलेल्या तलावाच्या बर्फात भेग पडते, तेव्हा खालील पाणी वर येते. हे पाणी आजूबाजूची बर्फ वितळवत पसरत जाते आणि ताऱ्यासारखा किंवा केळीच्या जाळ्यासारखा आकार तयार होतो.
वैज्ञानिकांना वाटते की युरोपावरही हाच प्रकार घडला असावा. युरोपाच्या बर्फाखाली खारट पाणी (ब्राइन) आहे. बर्फात तडा गेल्यावर हे पाणी वर येते. मात्र युरोपावर प्रचंड थंडी असल्यामुळे हे पाणी लगेच गोठते, पण गोठण्याआधी हा कोळीसारखा ठसा तयार होतो.
याचा अर्थ एलियन जीवन शक्य आहे का?
या संशोधनाच्या प्रमुख वैज्ञानिक लॉरेन मॅक कीओन यांनी सांगितलं की, हे ठसे फार महत्त्वाचे आहेत. कारण ते बर्फाखाली काय घडतंय, याची माहिती देतात. जर युरोपावर असे आणखी ठसे सापडले, तर तिथे बर्फाच्या खाली लहान पाण्याचे साठे असण्याची शक्यता बळावते.
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे युरोपाच्या आत सूक्ष्म जीवसृष्टी (मायक्रोबियल लाईफ) असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कोळीसारखा ठसा म्हणजे जणू वैज्ञानिकांसाठी एक नकाशाच आहे. जो सांगतो की भविष्यात संशोधन कुठे करायचे.
2030 मध्ये काय बदलणार?
आतापर्यंत उपलब्ध असलेल्या गॅलिलिओ स्पेसक्राफ्टच्या छायाचित्रांचा दर्जा मर्यादित आहे. गॅलिलिओ मिशन 2003 मध्ये संपले. पण आता नासाचे नवे मिशन ‘युरोपा क्लिपर’ युरोपाच्या दिशेने निघाले आहे. हे स्पेसक्राफ्ट एप्रिल 2030 मध्ये गुरूच्या कक्षेत पोहोचेल. ते युरोपाचे अत्यंत स्पष्ट आणि उच्च दर्जाचे फोटो घेईल. जर तिथे असे आणखी ‘लेक स्टार्स’ सापडले, तर युरोपा हा खऱ्या अर्थाने ‘ओशन वर्ल्ड’ असल्याची पुष्टी होईल.
ही शक्यता फक्त युरोपापुरती मर्यादित नाही. शनीचा चंद्र एनसेलॅडस यासारख्या इतर बर्फाच्छादित चंद्रांवरही बर्फाखाली महासागर असल्याचं मानलं जातं. पृथ्वीवर ज्या प्रक्रिया घडतात, त्या लाखो-कोटी किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावरही घडत असतील, ही कल्पनाच थक्क करणारी आहे.
