जेव्हा बोलणं समजून घेणं कठीण होतं, तेव्हा तुमचं मेंदू शांतपणे तुमच्या डोळ्यांची उघडझाप लवकर-लवकर करू नका असा संकेत देतो. यालाच आपण पापणी लवणे असेही म्हणतो. तुम्ही जितक्या कमी वेळा पापणी लवता, तितकं तुमचं मेंदू जास्त मेहनत घेत असतो. सभोवतालचा गोंगाट बाजूला सारून महत्त्वाच्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्यासाठी.
advertisement
पापणी लवणे ही श्वास घेण्यासारखी एक स्वयंचलित क्रिया आहे. आपण याकडे फारसं लक्ष देत नाही. आतापर्यंत बहुतेक वैज्ञानिक संशोधन पापणी लवण्याचा दृष्टीशी (डोळ्यांशी) संबंध काय आहे, यावर केंद्रित होतं. मात्र कॉनकॉर्डिया विद्यापीठाच्या नव्या संशोधनाने यामागचा एक वेगळाच आणि महत्त्वाचा पैलू उघड केला आहे. या अभ्यासात पापणी लवणं आणि मेंदूतील संज्ञानात्मक प्रक्रिया (cognitive processes) यांचा संबंध तपासण्यात आला आहे. विशेषतः गोंगाटात आपण बोलणं कसं समजून घेतो आणि मेंदू कसा अनावश्यक आवाज गाळून टाकतो, यावर.
हे संशोधन Trends in Hearing या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. या अभ्यासात संशोधकांनी दोन प्रयोग राबवले. ज्यामध्ये वेगवेगळ्या ऐकण्याच्या परिस्थितीत लोकांची पापणी लवण्याची पद्धत कशी बदलते, याचं निरीक्षण करण्यात आलं.
कमी पापणी लवणं म्हणजे जास्त मानसिक मेहनत
संशोधकांना आढळून आलं की गोंगाट असलेल्या वातावरणात बोलणं समजून घेण्यासाठी मेंदूला जास्त मेहनत घ्यावी लागते, तेव्हा लोक कमी वेळा पापणी लवतात. रोजच्या संभाषणात आपण नकळतपणे जे लक्ष केंद्रित करतो, त्याचं हे एक शारीरिक संकेत आहे. विशेष म्हणजे, खोलीतील प्रकाशमान बदललं तेजस्वी, मंद किंवा अगदी अंधार असला तरीही पापणी लवण्याच्या दरात फारसा फरक पडला नाही.
या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका पेनेलोप कुपाल, ज्या हिअरिंग अँड कॉग्निशन लॅबमध्ये ऑनर्स विद्यार्थिनी आहेत. त्यांनी सांगितले की, “आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की पर्यावरणीय घटक पापणी लवण्यावर परिणाम करतात का आणि त्याचा मेंदूच्या कार्याशी काय संबंध आहे. उदाहरणार्थ: एखादी व्यक्ती मुद्दाम पापणी लवण्याची वेळ ठरवते का, जेणेकरून बोलण्यातला महत्त्वाचा भाग चुकू नये?”
संशोधनातून स्पष्ट झालं की पापणी लवणं ही पूर्णपणे यादृच्छिक नसते, तर ती एका ठरावीक पद्धतीने घडते. कुपाल म्हणतात, “आपण मनमानी पापणी लवत नाही. जेव्हा महत्त्वाची माहिती मिळते, तेव्हा आपण आपोआप कमी पापणी लवतो.”
कठीण ऐकण्याच्या कामांदरम्यान पापणी कशी बदलते?
या अभ्यासात जवळपास 50 प्रौढ सहभागी होते. प्रत्येक व्यक्तीला एका ध्वनिनिरोधक (soundproof) खोलीत बसवण्यात आलं आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या एका स्थिर चिन्हाकडे पाहण्यास सांगण्यात आलं. त्यांनी हेडफोन्सद्वारे लहान-लहान वाक्यं ऐकली, पण त्याचवेळी पार्श्वभूमीतील गोंगाटाची पातळी बदलत होती.
हा गोंगाट इतका कमी होता की ऐकणं सोपं होतं, तर काही वेळा इतका जास्त होता की बोलणं समजणं खूप कठीण जात होतं. सहभागी व्यक्तींना आय-ट्रॅकिंग चष्मे घालण्यात आले होते. ज्यामुळे प्रत्येक पापणी कधी लवली, हे अचूकपणे नोंदवता येत होतं.
संशोधकांनी ऐकण्याचा प्रत्येक सत्र तीन टप्प्यांत विभागले होते. ज्यात...
वाक्य ऐकण्याआधी,
वाक्य ऐकत असताना,
आणि वाक्य संपल्यानंतर.
निरीक्षणातून असं दिसून आलं की वाक्य ऐकत असताना पापणी लवण्याचं प्रमाण सर्वात कमी होतं आणि हा परिणाम विशेषतः तेव्हा तीव्र होता, जेव्हा गोंगाट जास्त आणि बोलणं समजणं कठीण होतं.
प्रकाश कारणीभूत नाही
दुसऱ्या प्रयोगात संशोधकांनी प्रकाशमान बदलून पुन्हा ही चाचणी घेतली. सहभागी व्यक्तींनी अंधारात, मध्यम प्रकाशात आणि तेजस्वी प्रकाशात हीच ऐकण्याची कामं केली. प्रत्येक वेळी, वेगवेगळ्या गोंगाटाच्या पातळीवरही तोच पॅटर्न दिसून आला. बोलणं कठीण असलं की पापणी कमी लवली.
यावरून स्पष्ट झालं की हा परिणाम डोळ्यांत येणाऱ्या प्रकाशामुळे नसून, मेंदूवर पडणाऱ्या संज्ञानात्मक ताणामुळे आहे. जरी व्यक्तीगणिक पापणी लवण्याचं प्रमाण खूप वेगळं होतं. कोणी मिनिटाला फक्त 10 वेळा पापणी लवत होतं, तर कोणी 70 वेळा, तरी एकूण कल सांख्यिकीयदृष्ट्या स्पष्ट आणि महत्त्वाचा होता.
मेंदूचा अभ्यास करण्यासाठी पापणी एक नवं साधन
आधीच्या अनेक अभ्यासांमध्ये मानसिक मेहनत मोजण्यासाठी डोळ्यांच्या बुबुळाचा विस्तार (pupil dilation) पाहिला जात असे. अशा अभ्यासांमध्ये पापणी लवणं अनेकदा अडथळा मानून डेटा मधून काढून टाकलं जायचं. मात्र या संशोधनात जुन्या डेटाचा पुनर्विचार करून पापणी लवण्याच्या वेळेवर आणि वारंवारतेवर थेट लक्ष केंद्रित करण्यात आलं.
संशोधकांच्या मते, पापणी लवण्याचं प्रमाण हे मेंदूच्या कार्यक्षमतेचं एक सोपं आणि कमी खर्चिक मोजमाप ठरू शकतं. तेही प्रयोगशाळेतच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीतही.
या अभ्यासाचे सहलेखक आणि मानसशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक मिकाएल डेरोश सांगतात, “पापणी लवणं म्हणजे काही काळासाठी दृश्य आणि श्राव्य माहिती गमावणं. त्यामुळेच जेव्हा महत्त्वाची माहिती येते, तेव्हा आपण पापणी लवणं दाबून ठेवतो.”
ते पुढे म्हणतात की, या निष्कर्षांवर अधिक ठोस शिक्कामोर्तब करण्यासाठी पापणी लवताना नेमकी कोणती आणि किती माहिती हरवते, याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी पुढील संशोधन सुरू असून, त्याचे नेतृत्व पोस्टडॉक्टरल फेलो शार्लोट बिग्रास करत आहेत. या संशोधनात यू झांग यांचेही योगदान आहे.
संशोधकांच्या मते, हे निष्कर्ष साधे वाटले तरी त्याचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे असून, मानवी मेंदू माहिती कशी प्रक्रिया करतो, याबाबत नवे पैलू उघडणारे आहेत.
स्मरणशक्ती जाण्याआधीच अल्झायमर रोखता येणार; नव्या औषधाने रुग्णांसह कुटुंबियांना दिलासा
New Drug For Alzheimer : अल्झायमरमुळे स्मरणशक्ती कमी होण्याची भीती अनेक कुटुंबांना भेडसावत असते, पण नव्या वैज्ञानिक संशोधनातून दिलासादायक आशा निर्माण झाली आहे. लक्षणे दिसण्याआधीच आजाराची प्रक्रिया थांबवण्याची शक्यता या अभ्यासातून समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
