अंटार्कटिकामधील जगातील सर्वात मोठ्या हिमखंडांपैकी एक असलेला A-23A आता वेगाने वितळण्याच्या आणि तुटण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गरम समुद्री पाण्यात प्रवेश करताच या हिमखंडावर निळसर रंग स्पष्ट दिसू लागला असून, वैज्ञानिकांच्या मते हे त्याच्या विघटनाचं ठळक लक्षण आहे.
1986 मध्ये अंटार्कटिकाच्या फिल्चनर आइस शेल्फपासून वेगळा झालेला A-23A गेली अनेक दशके जगातील सर्वाधिक निरीक्षणात असलेला आणि दीर्घकाळ टिकलेला हिमखंड मानला जात होता. मात्र आता हवामानातील बदलांचा त्याच्यावर थेट परिणाम दिसत आहे.
advertisement
4 हजारवरून 1,182 चौ.किमीपर्यंत आकुंचन
हा हिमखंड कधीकाळी सुमारे 4,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला म्हणजे जवळपास मुंबईपेक्षा दुप्पट होय. जानेवारी 2026 च्या सुरुवातीला फक्त 1,182 चौरस किलोमीटरपर्यंत मर्यादीत राहिला आहे. सध्या तो दक्षिण अमेरिका आणि साउथ जॉर्जिया बेटांच्या दरम्यान समुद्रात तरंगत असून, येथे त्याचं वेगाने वितळणं सुरू आहे.
उपग्रह छायाचित्रांत निळे पाण्याचे तलाव
नासाच्या टेरा सॅटेलाइटने 26 डिसेंबर 2025 रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हिमखंडाच्या पृष्ठभागावर मोठमोठे निळ्या रंगाचे पाण्याचे तलाव दिसून आले. रंगातील हा बदल आणि क्षेत्रफळात झालेली मोठी घट, हिमखंडाच्या अंतिम विघटन टप्प्याकडे इशारा करत आहे. तरीही सध्या A-23A अजूनही समुद्रात तरंगणाऱ्या सर्वात मोठ्या हिमखंडांपैकी एक आहे.
निळा रंग का दिसतो?
तज्ज्ञांच्या मते, हिमखंडावर साचलेल्या वितळलेल्या पाण्यामुळे हा निळसर रंग दिसतो. कोलोरॅडो विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ टेड स्कॅम्बोस यांच्या मते, “जेव्हा पाणी बर्फातील भेगांमध्ये साचतं, तेव्हा त्याचं वजन त्या भेगा अधिक रुंद करतं. यामुळे हिमखंड तुटण्याची प्रक्रिया आणखी वेगवान होते.”
अंतराळ स्थानकावरूनही स्पष्ट दृश्य
27 डिसेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) घेतलेल्या छायाचित्रांमध्येही हिमखंडावर पिघळलेल्या पाण्याचे तलाव स्पष्ट दिसतात. केवळ कडांवर एक पातळ पांढरी बर्फाची किनार उरली आहे. त्यावर दिसणाऱ्या निळ्या आणि पांढऱ्या सरळ रेषा या प्राचीन हिमनद्यांच्या रचनेच्या खुणा असल्याचं वैज्ञानिक सांगतात.
नॅशनल स्नो अँड आइस डेटा सेंटरचे शास्त्रज्ञ वॉल्ट मायर यांच्या मते, या रेषा बर्फाच्या प्रवाहाच्या दिशेनुसार तयार झाल्या असून, आज त्या पिघळलेल्या पाण्याच्या वाहण्यालाही दिशा देत आहेत.
दशकांनंतरही जपलेल्या प्राचीन खुणा
मेरीलँड विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ क्रिस शूमन म्हणतात, “इतकी वर्षे, प्रचंड हिमवृष्टी आणि खालील बाजूने मोठ्या प्रमाणावर वितळणं झालं असतानाही या खुणा आजही स्पष्ट दिसणं आश्चर्यकारक आहे.”
‘ब्लोआउट’ आणि समुद्रात गोड्या पाण्याचा प्रवाह
वैज्ञानिकांच्या मते, हिमखंडात आता एक प्रकारचा ‘ब्लोआउट’ तयार झाला आहे. त्यामुळे पिघळलेलं पाणी थेट समुद्रात वाहू लागलं असून, आजूबाजूच्या समुद्री भागात गोड्या पाण्याचा प्रवाह (फ्रेशवॉटर प्लूम) तयार झाल्याचं उपग्रह छायाचित्रांतून दिसून येत आहे.
तुटणं आता अटळ
तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की A-23A चं पूर्णपणे तुटणं आता केवळ वेळेचा प्रश्न आहे. “दक्षिणी गोलार्धातील उन्हाळा संपेपर्यंत हा हिमखंड टिकेल, असं मला वाटत नाही,” असं शूमन म्हणाले. गरम समुद्री पाणी आणि वाढतं हवेचं तापमान या भागाला ‘हिमखंडांचं स्मशानभूमी’ बनवत आहे, जिथे मोठे हिमखंडही फार काळ टिकत नाहीत.
मुंबईपेक्षा दुप्पट आकाराचा हा विशाल हिमखंड आता निळसर होत चालला आहे. A-23A केवळ हवामान बदलाचं प्रतीक नाही, तर गरम होत असलेल्या महासागरांपुढे पृथ्वीचे सर्वात भव्य बर्फाचे ढांचेही किती असुरक्षित आहेत, याचं जिवंत उदाहरण आहे.
