आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या मागणीला केराची टोपली दाखवली. बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर पाकिस्तानची टीम हॉटेलमधून स्टेडियमच्या दिशेने निघाली. स्टेडियममध्ये आल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा जेव्हा टॉससाठी मैदानात आला, तेव्हा त्याच्यासमोर मॅच रेफरी म्हणून ऍन्डी पायक्रॉफ्टच उभे होते, त्यामुळे या संपूर्ण वादामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचं जगासमोर हसं झालं आहे.
advertisement
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घातलेल्या या सगळ्या गोंधळामुळे मॅच सुरू व्हायला एक तास उशीर झाला. या सामन्यात युएईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. युएईविरुद्ध पराभव झाला तर पाकिस्तानचं आशिया कपमधलं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपेल. पण पाकिस्तानने हा सामना जिंकला तर भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर-4 मध्ये रविवार 21 सप्टेंबर रोजी सामना होईल.
पायक्रॉफ्टसोबत काय झाला वाद?
भारत-पाकिस्तान सामन्यावेळी टॉसआधी मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला सांगितलं. ऍन्डी पायक्रॉफ्ट यांचं हे वर्तन नियमांना धरून नसल्याची तक्रार पीसीबीने आयसीसीकडे केली. तसंच मॅच रेफरी पायक्रॉफ्ट यांनी टीम इंडियाची बाजू घेतल्याचा आरोपही पीसीबीने केला. तसंच पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणीही पीसीबीने केली, पण आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली.